
हरियाणातील गुरुग्राममध्ये एका तरुणाने दलित तरुणीशी पाच महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यामुळे मुलीच्या गावातील समाज संतप्त झाला होता. मुलाने गावात पाय ठेवल्यास त्याला ठार मारण्याची धमकी गावकऱ्यांनी दिली होती. लग्नानंतर पाच महिन्यांनी तरुण सासुरवाडीला येत होता. त्यावेळी गावातील काही तरुणांनी त्याला अडवले आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पाचजणांना अटक केली आहे.
हरियाणातील गुरुग्रामच्या बादशाहपूर गावात ही घटना घडली आहे. एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या आकाशने बादशहापूर गावातील एका दलित तरुणीशी 5 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यामुळे मुलीच्या समाजातील लोकांमध्ये रोष होता. त्यांच्या मनात आकाशविरोधात संताप होता. त्यामुळे आकाश गावात आल्यास त्याला ठार मारण्याची धमकी गावातील तरुणांनी दिली होती.
लग्नानंतर पाच महिन्यांनी 8 नोव्हेंबरला अचानक आकाश सासुरवाडीला येत होता. त्यावेळी मुलीच्या समाजातील काही तरुणांनी त्याला बघितले. त्याला रस्त्यातच अडवून आमच्या गावात का आलास अशी विचारणा करत लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत आकाश गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले.
उपचारादरम्यान 10 नोव्हेंबरला आकाशचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. आकाशला मारहाण करणाऱ्या पाच तरुणांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आकाशला मारहाण करणारे पाचही तरुण बादशहापूर गावातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. पवन, मोहीत, इंद्रजीत, अजय, लालू उर्फ धनमेंद्र आणि रवी अशी आरोपींची नवे असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
























































