
नवरा बायकोचं भांडण ही काही नवीन बाब नाही. पण, त्याच भांडणाचा भयंकर परिणाम हरयाणाच्या हिसार जिल्ह्यात झाला आहे. येथे एका दांपत्यात इतकं भयंकर भांडण झालं की बायकोने नवऱ्याची जीभ तोडली आहे.
हिसार जिल्ह्यातील घायल ढाणी गारन येथील करमचंद नावाच्या माणसासोबत हा प्रकार घडला आहे. करमचंदची बायको सरस्वती हिच्यासोबत त्याचं भांडण झालं. भांडणाच्या भरात सरस्वतीने करमचंदची जीभ कापली. 27 जानेवारी रोजी ही घटना घडली. रात्री नऊ वाजता सरस्वतीने करमचंदची जीभ कापल्यानंतर तो विव्हळू लागला. त्यामुळे त्याचे आई वडील धावून आले. त्यांना करमचंद रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसला.
जीभ कापल्यामुळे त्याला बोलता येत नव्हतं. त्याच्या डोक्यावरही जखम दिसत होती. सरस्वती हिने करमचंदच्या आईवडिलांना शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं.
तेथील एका खासगी रुग्णालयात त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. त्याची जीभ 15 टाके घालून जोडण्यात आली. करमचंद अद्याप बोलू शकत नाही. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


























































