
हातकणंगले टोलनाक्यावरील रस्तादुभाजकाला कार धडकून दोनजण ठार झाल्याची घटना सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील हातकणंगले तालुक्यातील शिरोली येथील ‘मार्बल लाइन’ येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. करण रमेश पोवार (रा. रामानंदनगर) व सूरज सदाशिव पाटील (रा. संभाजीनगर, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत.
सूरज पाटील यांचा क्रॅपचा व्यवसाय होता. त्याची वसुली करण्यासाठी ते करण पोवार यांच्यासह इंडिका विस्टा कारमधून इचलकरंजी, जयसिंगपूर येथे गेले होते. तेथून रात्री उशिरा ते कोल्हापूरला येत होते. मार्बल लाइनजवळ आले असता, टोलवसुलीसाठी बांधलेल्या शेडच्या दुभाजकाला भरधाव कारची धडक बसली. यात करण पोवारचा जागीच मृत्यू झाला, तर चालक सूरज पाटील गंभीर जखमी झाला होता. त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शनिवारी सकाळी उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले तपास करीत आहेत.




























































