
हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी शिक्षण संस्थाचालकासह त्याच्या प्राचार्य पत्नीविरोधात शिरोली पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, त्यांच्यावर अद्यापि कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ या शाळेवर आज मूक मोर्चा काढण्यात आला. मात्र, या मोर्चाला हिंसक वळण लागले. काही तरुणांनी शाळेवर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता.
आर्यन हेरंभ बुडकर (वय 15) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, शिक्षण संस्थाचालक गणपती पाटील व प्राचार्या गीता गणपती पाटील या पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.
फुटबॉल खेळताना चुकून एका मुलीला फुटबॉला लागल्यानंतर संबंधित संस्थाचालकाने आर्यनला उद्यापासून शाळेत घेणार नाही, असे सांगितले. त्यामुळे आर्यनने शनिवारी (दि. 2) गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी पाटील दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, पुढची कारवाई न झाल्याने पुलाची शिरोली ग्रामस्थ आक्रमक झाले होते. पाटील दाम्पत्याला तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलवर आज मोर्चा काढण्यात आला. आर्यनला न्याय द्या, सिम्बॉलिक शाळा प्रशासनाचा जाहीर निषेध, अशा किती आर्यनचे बळी घेणार, सिम्बॉलिकच्या पालकांनो सावध व्हा, आपला पाल्य योग्य हाती सोपवा, संस्थाचालक गणपत पाटील व प्राचार्य गीता पाटील यांना अटक कधी होणार, अशा आशयाचे फलक हातात घेऊन हा मोर्चा गावातून शाळेसमोर आला. दहावीची परीक्षा सुरू असल्याने मोर्चाला शाळेच्या फाटकावर रोखले. तिथे निवेदन देऊन मोर्चाचा समारोप झाला.
दरम्यान, यावेळी शाळेच्या फाटकावर शाळा प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेला आर्यनच्या श्रद्धांजलीचा फलक काढून घ्यावा, अशी मागणी मोर्चात सहभागी तरुणांनी केली. त्यानंतर हा फलक काढण्यात आला. तरीही मोर्चातून परत जात असताना काही तरुणांनी दगडफेक केली. यामध्ये सुरक्षारक्षकाची केबिन, इमारतीत दुसऱया मजल्यावर असणाऱया क्लास रूम व प्रयोगशाळेच्या काचा फोडण्यात आल्या.




























































