चेहरे बघून तुम्ही नियुक्त्या करता का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अंधांसाठी असलेल्या नोकर भरतीत अंध व्यक्तींनाच डावलल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला खडे बोल सुनावले. दृष्टीहीनांसाठी पदे आरक्षित असतानाही त्यांना वैद्यकीय चाचणीत अंध असल्याच्या कारणावरून का नाकारता. उमेदवारांचे चेहेरे बघून तुम्ही नियुक्त्या करता का, अशा शब्दात हायकोर्टाने महापालिकेला झापले. मुंबई महापालिकेने ऑक्टोबर २०१६ साली अंधांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया राबवली होती इच्छुक उमेदवारांपैकी २०७ जणांची निवड करण्यात आली परंतु प्रत्यक्षात भरती करताना १०७ जणांनाच कामावर ठेवण्यात आले. ८२ उमेदवारांना ते अंध असल्याच्या कारणावरून नाकारण्यात आले. याप्रकरणी संतोष राजापुरे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.