आळंदीत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’अभियानात 6 हजार 650 कुटुंबांची आरोग्य तपासणी पूर्ण

आळंदी नगरपरिषदेने शासनाच्या धोरणाप्रमाणे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानात आळंदी नगरपरिषदेच्या 9 प्रभागात एकाच वेळी सुमारे 6 हजार 650 कुटुंबांच्या घरी जात त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यात 202 लोकांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये 29 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या 29 रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.

या मोहिमेत 45 प्रशिक्षित आरोग्य सेवकांची पथके तयार करून सुमारे 112 प्रशिक्षित शिक्षक, कर्मचारी व आरोग्य वैद्यकीय सेवक कर्मचारी यांचे सहकार्य घेण्यात आले आहे. घर भेटीच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी मोहिमेत पदाधिकारी व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या धोरणाप्रमाणे सुरू करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत प्रभावीपणे जनजागृती करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.

या मोहिमेत घरोघरी जाऊन सर्व नागरिकांची ऑक्सिजन व ताप याबाबतची तपासणी करण्यात आली. यासाठी सर्व सेवकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली होती. या मोहिमेला नागरिक,पदाधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळत आहे. या अभियानात शहरातील 9 प्रभागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन जनजागृती देखील केली जाणार आहे. आळंदीत शुक्रवारी 14 नवे रुग्ण आढळले. तर शनिवारी 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या आळंदीत 100 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत आळंदीत 12 रुग्णांचे निधन झाले आहे. तर 611 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आळंदीतील कोरोनाबाधितांची संख्या 723 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या