
सामना ऑनलाईन, कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये आलेल्या भीषण पूरपरिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर बचाव तसेच मदत कार्य सुरू आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमध्ये तळ ठोकून बसले आहेत. लोकांना जलदगतीने मदत मिळावी यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहे. परिस्थितीचा आढावा घेत असताना एका आजारी महिलेचा पीडा त्यांना दिसून असल्या. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांची गाडी या महिलेला देऊ केली आणि तिला रुग्णालयात दाखल करेपर्यंत सगळ्या प्रक्रियांचा जातीने पाठपुरावा केला.
कोल्हापूर शहरातील शाहू सांस्कृतिक मंदिरात पूरग्रस्तांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे. इथे आलेल्या लोकांना जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पूरग्रस्तांमध्ये एक आजारी महिला असल्याचे शिंदे यांना कळाले. या महिलेला तिचे नातेवाईक खांद्यावरून रुग्णालयात नेण्याचा विचार करत होते. ही बाब कळाल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी या महिलेची विचारपूस केली आणि तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.
तर दुसरीकडे सांगलीवाडी इथे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत हे देखील स्वत: बचावकार्यात उतरले होते. इथल्या यश ढाब्याजवळ विनायक माळी नावाची व्यक्ती अडकली होती. प्लॅस्टीकच्या ड्रमवर लाकडी फळी टाकून ते त्यावर बसून राहिले होते. त्यांची राज्यमंत्री खोत यांच्यासोबत असलेल्या बचावदलाने सुटका केली.माळी यांना औषधोपचारासाठी आष्टा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



























































