
सामना प्रतिनिधी । शिर्डी
किसान क्रांती समन्वय समितीच्या ‘देता की जाता’ आंदोलनास पाठिंबा देत पुणतांबा येथील शेतकरीकन्यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. आंदोलक मुलींचे वजन घटले असून शुभांगी जाधव हिची प्रकृती खालावली आहे. मात्र रुग्णालयात जाण्यास शुभांगीने नकार दिलाय.
– प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ‘भीख मांगो’ आंदोलन करत जमलेल्या पैशाची मनिऑर्डर मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे.
पुणतांबा येथे निकिता जाधव, शुभांगी जाधव आणि पूनम जाधव या तिघी गेल्या चार दिवसांपासून शेतकऱयांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनास बसल्या आहेत. सातबारा कोरा करा, शेतमालाला योग्य भाव द्यावा, अशा विविध प्रश्नांवर चार दिवसांपासून शेतकऱयांच्या मुलींनी आंदोलन सुरू केले आहे. अन्नत्याग केल्याने तिन्ही मुलींचे वजन घटले आहे. यापैकी शुभांगी जाधवची प्रकृती खालावली आहे. शुभांगीला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला, मात्र त्यास शुभांगीने नकार दिला.
































































