सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीत दमदार पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nagar-rain

सामना प्रतिनिधी । नाशिक

नाशिक जिह्यातील सुरगाणा, पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये दोन दिवस दमदार पाऊस झाला. जिह्यात २४ तासांत एकूण ४०१.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सुरगाणा तालुक्याला गुरुवारी व शुक्रवारी दिवसभर पावसाने झोडपले. पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथेही दमदार पाऊस झाला. नाशिक शहरात गुरुवारी रात्री पावसाने हजेरी लावली. मात्र, आज दिवसभर उघडीप दिली. दिंडोरी, देवळा, निफाड, सिन्नर, येवला, नांदगाव, सटाणा, कळवण या तालुक्यांमध्ये रिमझिम पाऊस झाला, तर चांदवड व मालेगावमध्ये सायंकाळपर्यंत पाऊस झालेला नव्हता.

भात लावणीची लगबग
पावसाची संततधार सुरू असल्याने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये भात लावणी कामाची लगबग सुरू आहे.

जिह्यात ४०१ मिलिमीटर नोंद
नाशिक जिह्यात चोवीस तासात एकूण ४०१.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक १४५.५ मिलिमीटर पाऊस सुरगाण्यात झाला. तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे – सुरगाणा- १४५.५, पेठ- ७०, इगतपुरी- ६५, त्र्यंबकेश्वर- ४५, दिंडोरी- २२, कळवण- १३, नाशिक- ११, सिन्नर- ६, चांदवड- ५.४, देवळा- ४.२, सटाणा- ४, निफाड- ३, येवला- ३, मालेगाव- २, नांदगाव- २.