नांदेडमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदेड-हैद्राबाद मार्ग, नांदेड-किनवट मार्ग, भोकर-किनवट मार्ग, नांदेड-देगलूर मार्ग या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली असून, सर्वच नद्या,नाल्यांना पूर आले आहेत. लिंबोटी धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आले असून, नांदेड-लोहा मार्ग गेल्या तीन तासांपासून बंद आहे. अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला असून, पुरात मुखेड तालुक्यात दोघेजण वाहून गेले होते, त्यापैकी एकाला जिवंत शोधण्यात महसूल यंत्रणेला यश आले आहे. विष्णूपुरी प्रकल्पाचे 15 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झाला असून, पावसाने जिल्ह्याची सरासरी ओलांडली असून, जिल्ह्यात 908.30 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्याची एकूण सरासरी 891.30 मि.मी. एवढी आहे. विष्णूपुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा गोदावरी नदीपात्रात पंधरा दरवाजे उघडून सोडण्यात येत असल्याने  नदीकाठच्या गावांना सतर्वâतेचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड, मुदखेड, उमरी, धर्माबाद, नायगाव या तालुक्यात या पाण्यामुळे अनेक भाग जलमय झाला आहे. तसेच नांदेडच्या दासगणू (नावघाट) पुलाच्या वरुन पाणी वाहत असून, धोक्याची पातळी 354 मीटर आहे. सध्या देगलूर नाका येथील पुलावर 352 मीटर पाणी वाहत आहे.

शहरातील सर्वच सखल भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, अनेक भागात पाणी शिरले आहे. शहरातील अनेक वस्त्यांत नाल्यांचेही पाणी घुसल्याने प्रामुख्याने जुना भाग, वसंतनगर आदी भागात पाणी तुंबले आहे. गोवर्धनघाट येथील स्मशानभूमी पूर्णतः पाण्याखाली आली असून, शनिमंदिराच्या पायथ्याच्यावरे पाणी गेले आहे. आज जिल्हाधिकारी तसेच अन्य अधिकार्‍यांनी शहराची पाहणी करुन आपत्ती व्यवस्थापनाचा नियोजनाचा आढावा घेतला. विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाण्याच्या येव्यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तळणी येथील तलाव फुटल्यामुळे त्या परिसरातील सर्वच गावात पाणी साचले आहे. जवळपास 80 ते 90 गावांचा जिल्ह्यातून संपर्क तुटला आहे. लिंबोटी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून, धरणाच्या परिसरातील गावात सतर्वâतेचा इशारा देण्यात आला आहे.

इसापूर धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता लक्षात घेता किनवट, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यात देखील सतर्वâतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मुखेड तालुक्यात एक कार वाहून गेली असून, त्यातील दोघांपैकी एकाला जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. दुसर्‍या व्यक्तीचा शोध अद्यापही सुरु आहे. जिल्ह्यातील जवळपास 24 मंडळात अतिवृष्टी झाली असून, सर्वाधिक पाऊस भोकर तालुक्यात (104.50 मी.मी.) एवढा झाला आहे. अर्धापूर तालुक्यात देखील पावसाने कहर केला असून जिल्ह्यातील लेंडी, मांजरा, आसना, गोदावरी, मन्याड, या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. तेलंगणा व आंध्रप्रदेशमध्ये जाणारे सर्व रस्ते सिमेच्या अलिकडच्या भागात ठप्प झाल्याने वाहतूक खोळंबली आहे. जिल्ह्यातील अर्धापूर, शिवणी, पिंपरखेड, मनाठा, भोकर, रामतिर्थ, आष्टी, धर्माबाद, हिमायतनगर, कुंटूर, नायगाव, नरसी, जवळगाव, उस्माननगर, मालेगाव, दिग्रस, मुक्रमाबाद या सर्वâलमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

या पावसामुळे जिल्ह्यातील पिकाचे मोठे नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला शेतकर्‍यांचा घास या अतिवृष्टीने हिरावून नेला आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पोटा ता.हिमायतनगर येथे काल रात्री संतोष केशवराव सूर्यवंशी यांचे दोन बैल वीज पडून मृत पावले आहेत. तसेच कौठा ता.वंâधार येथे मारोती कामाजी घोरपे यांची एक म्हैस पूरात वाहून मयत झाली आहे. सावळी ता.बिलोली येथे एक गाय व एक वासरु पुरात वाहून मयत झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान मेथी ता.मुखेड येथील यादव जळबाजी हिवराळे हे पूरात वाहून गेल्याने त्यांचे शोधकार्य सध्या सुरु आहे. यासाठी दोन वेगवेगळ्या बोटी व आपत्ती व्यवस्थापनाचे जवान त्याठिकाणी पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी ईटनकर यांनी सांगितले.

मुक्रमाबाद, बार्‍हाळी परिसरात  सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुंद्राळ नदीला महापूर आल्याने या पुरात थोटवाडी येथील तीन शेतकरी पूराच्या पाण्यात अडकले असून, त्यांना सुरक्षितस्थळी आणण्यासाठी प्रशासन वेगवेगळे प्रयत्न करीत आहे.

व्यंकट गोपवाड, बापूराव गोपवाड, नागेश गोपवाड रा. थोटवाडी ता. मुखेड जि. नांदेड येथील शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले असून, हे तिघेही एका झाडाला आसरा धरून आहेत. त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे नांदेडच्या विशेष पथकाकडून बोटीव्दारे पुराच्या बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांनी दिली.