
मुंबईत आज सकाळपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने नोकरदार घरी जाण्याच्या वेळीच जोर धरल्याने रेल्वेला ब्रेक लागला. दादर रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेवर ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल दीड तास नोकरदार अडकून पडले. शिवाय दादर-माटुंगा, ऍण्टॉप हिलसह मुंबई शहराच्या वेगवेगळय़ा भागांत लाइट गुल झाल्याने रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
मुंबईत सायंकाळपासून पावसाने जोर धरला. पावसाचा जोर अचानक वाढल्याने घर गाठण्यासाठी मुंबईकरांची धांदल उडाली. मात्र अचानक सुरू झालेल्या पावसाचा रेल्वे सेवेवरही मोठा परिणाम झाला. चर्चगेट स्थानकातून सुटणाऱया काही लोकल रद्द केल्याने पश्चिम मार्गावरही प्रवाशांची मोठी गर्दी झाली. शिवाय मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाडाने घरी जाणारे प्रवासी लटकले. ट्रेनच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ट्रेन पाच ते दहा मिनिटांनी उशिराने धावत होत्या. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.
शहर भागात चार ठिकाणी इमारत-भिंती कोसळल्या
पावसाची बरसात सुरू असताना काळबादेवी, बदामवाडी या ठिकाणी म्हाडाच्या तळमजला अधिक चार मजली इमारतीचा भाग कोसळण्याची दुर्घटना घडली. तर शीव हरी मस्जिद, गुरुनानक शाळेजवळ, तळमजला अधिक पाच मजली रिकाम्या इमारतीचा (क्रमांक 15) काही भाग सायंकाळी कोसळला. तसेच शहर भागात आणखीन दोन ठिकाणी घराचा भाग कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत, मात्र सुदैवाने या घटनांत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.




























































