
सामना प्रतिनिधी। भामरागड
गडचिरोली जिल्हयातील दक्षिण भागात असलेल्या भामरागड येथे पर्लकोटा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीचे पाणी गावात शिरले आहे. यामुळे १५० गावं पाण्याखाली गेली असून इतर गावांशी त्यांचा संपर्क तुटला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून गडचिरोली व त्याच्या आजूबाजूच्या गावात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत. त्यातच छत्तीसगड राज्यातून येणाऱ्या इंद्रावती, पमुलागौतम आणि पर्लकोटा या तिन्ही नद्या भामरागड येथे एकत्र येतात. यामुळे येथे पाण्याची पातळी वाढली आहे. भामरागड येथे दरवर्षी पावसाळ्यात १०० टक्के पाऊस पडतो. यामुळे गेली अनेक वर्ष येथील पर्लकोटा नदीच्या पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिक करत आहेत.


























































