
मुसळधार पावसाने जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात हाहाकार माजविला असून ढगफुटी झाल्याने गावंच्या गावं वाहून गेली आहेत. कश्मीर खोऱयात गंदरबल जिल्ह्यात भयंकर महापूर आला आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ धरमशाला येथील शेकडो घरे वाहने वाहून गेली. पर्यटक धास्तावले असून पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्याचे काम सुरू आहे.
गंदरबाल जिह्यात भयंकर पूर
- जम्मू-कश्मीरात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्तळीत झाले. जम्मूत 150 मिमी. पावसाची नोंद झाली. कटरा, कठुआ, पहेलगाम, गुलमर्ग, अनंतनाग, कुपवाडा, श्रीनगर येथेही जोरदार पाऊस कोसळत आहे.
- मध्य कश्मीरातील गंदरबाल जिह्यात अक्षरशः ढगफुटी झाली. जिह्यातील अनेक भागात पूर आला. त्यामुळे हाहाकार उडाला.
- घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांनी छतांवर आसरा घेतला. वीजपुरवठा खंडित झाला आहे. शेकडो झाडे उन्मळून पडली. रस्ते उखडल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
पर्यटनस्थळाची प्रचंड हानी
- हिमाचल प्रदेशात रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन ठप्प झाले.
- प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या धरमशाला येथे सर्वात जास्त हानी झाली. प्रचंड पाऊस आणि नद्यांना पूर आल्याने शेकडो घरे, वाहने वाहून गेली. हॉटेलचेही मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी ‘एनडीआरएफ’चे पथक दाखल झाले आहेत. संपूर्ण डोंगराळ भाग असल्याने दरडी कोसळण्याची भीती आहे.
- हिमाचल पद्रेशातील नागसू नाग येथेही पावसाने हाहाकार माजविला. भागसुंग येथे शाळेची इमारत कोसळली.





























































