
सामना ऑनलाईन । देवरुख
पावसामुळे संगमेश्वर देवरुख मार्गावर कोसुंब येथे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली तर बऱयाच ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे. या पावसामुळे टंचाईग्रस्त भागासह, शेतकरी आणि तालुकावासीयांनी समाधान व्यक्त केले असले तरी शेतात सर्वत्र पाणी साठल्याने शेतकऱयांना शेतीची कामे करणे अशक्य झाले होते परिणामी शेतकरी वर्गाने आज आराम करणेच पसंत केले.
शनिवारी रात्रीच्या सुमारास संगमेश्वर तालुक्याच्या साखरपा, देवरुख, संगमेश्वर, आरवली, कडवई, माखजन, करजुवे, कसबा, फणसवणे, नायरी, वाशी, पाचांबे, धामणी, तुरळ आदी सर्वच गावातून पावसाने जोरदार झोडपायला सुरूवात केली. जवळपास सलग सहा तास कोसळलेल्या पावसाने शेतांसह सर्वत्र पाणीच पाणी झाले
आजच्या पावसाने मजुरीसाठी परप्रांतातून आलेल्या कामगारांच्या झोपडय़ातून पाणी गेल्याने त्यांची संसाराचे सामान सुरक्षितस्थळी हलवताना चांगलीच तारांबळ उडाली. गेले आठ महिने कोरडे पडलेले वहाळ आणि ओढे आजच्या पावसाने वाहू लागले आहेत.
वेंगुर्ले – होडावडा – वजराट रस्ता खचला
वेंगुर्लेत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारा होडावडा-वजराट मुख्य रस्ता ते चव्हाटा मंदिराकडे जाणारा रस्ता पहिल्या पावसातच खचल्याने येथील एसटी वाहतूक बंद झाल्याने जवळजवळ येथील गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाबरोबरच येथील पाचशे ग्रामस्थांच्या दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खचलेल्या रस्त्याची त्वरित योग्य ती डागडुजी करून रस्ता वाहतुकीस खुला करा अन्यथा ग्रामस्थ आक्रमक होऊन वेंगुर्ले-सावंतवाडी मुख्य मार्गावर रास्ता रोको करणार असल्याचा इशारा येथील ग्रामस्थानी दिला आहे.
चिपळूण – झाड पडल्याने महामार्ग विस्कळीत
शनिवारी मध्यरात्रीपासून वरुणराजाने जोरदार आगमन केले. ढगांचा गडगडाट, विजेच्या कडकडाटात व वादळवाऱयासहित बरसलेल्या वरुणराजाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडवली. ग्रामीण भागात जोराणे बरसलेल्या पावसामुळे ओढे, नद्या, नाले ओसंडून वाहू लागले. तर मुंबई- गोवा महामार्गावरील कापसाळ येथे जुनाट वृक्ष पहाटे कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर खोळंबली होती तर चिपळूणची गंगा म्हणून प्रसिद्ध असणारी वाशिष्ठाr व चिपळूण शहराच्या मध्यवर्ती परिसरातून वाहणारी शिव नदीच्या पात्रात वाढ झाली. तसेच नेहमीप्रमाणे महावितरणची सेवा खंडित करण्यात आली होती तर बीएसएनएलच्या सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
वैभववाडी – छोटे कॉजवे पाण्याखाली; बत्तीही गूल
जिह्यात सलग दोन दिवस मुसळधार कोसळणाऱया पावसामुळे भात पेरणीची कामे खोळंबली आहेत. तर तालुक्यातील काही गावांतील छोटे काजवे पाण्याखाली गेले आहेत.
या वर्षी निर्धारित वेळेच्या आधी नैऋत्य मोसमी म्हणजेच पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. खरिपाचा हंगाम सुरू झाल्याने शेतकरी शेतात व्यस्त असताना दिसत आहे. शनिवारपासून सलग दोन दिवस कोसळणाऱया पावसामुळे भात पेरणीची कामे खोळंबली आहेत. तर नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील छोटे कॉजवे पहिल्याच पावसात पाण्याखाली गेले आहेत. रविवारी दुपार पर्यंत पावसाचा जोर कायम होता.


































































