
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
यंदाच्या मोसमातल्या पहिल्याच पावसाने गुरुवारी शहराला चांगलेच झोडपून काढले. दिवसभर ढगाळ वातावरण आणि सायंकाळी मेघगर्जनेसह तासभर दणक्यात आलेल्या या पावसाचे पाणी वस्त्यांतील घराघरांत, दुकानांतही घुसले. एकाएकी धुवाधार बरसलेल्या या पावसामुळे वाहनधारकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील नाले भरून वाहिले. बहुतांश भागांतील वीजपुरवठाही खंडित झाला.
मृग नक्षत्र लागून पंधरवडा होत आला तरी संभाजीनगरात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. उर्वरित मराठवाड्यात दमदार कोसळणारा पाऊस गुरुवारी पहिल्यांदाच शहरात बरसला. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत होता. त्यातच दुपारी दोन वाजेच्या सुमारास हलक्या सरी आणि सायंकाळी चांगला पाऊस पडल्याने सुखद दिलासा मिळाला. रात्री उशिरापर्यंत मेघगर्जनेसह पाऊस कोसळत राहिला. संततधार पावसामुळे अनेक घरांत पाणी शिरले. निराला बाजार भागात तापडिया नाट्यमंदिराजवळील कॉलनीतील घरांत पाणी शिरले. समतानगरातील ड्रायव्हिंग शाळेजवळील घरात पाणी शिरले तसेच सिडको एन-७ मधील नरेंद्र हाऊसिंग सोसायटीतील घरे पाण्याने वेढली गेली. पाठोपाठ आझाद चौक, भारतनगरातही घरांत पाणी शिरले होते. काही भागातील वीजपुरवठा बंद पडला होता. अनेक भागात विजेचा लपंडाव सुरू होता. अग्निशमन दलाच्या पथकाची मात्र तारांबळ उडत होती.































































