
सामना प्रतिनिधी । देवरूख
शुक्रवार दुपारपासुन सुरू असलेल्या अविश्रांत मुसळधार पावसाने संगमेश्वर तालुक्याला झोडपून काढले. तालुक्यातील सर्वच नद्यांना पुर आले त्यामुळे संगमेश्वर, माखजन, फुणगुस बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले होते. दरड कोसळल्याने देवरूख – कुंडी तर रस्त्यावर पाणी आल्याने देवरूख – सायले, संगमेश्वर – कुंभारखाणी मार्ग बंद होते.
गेल्या 24 तासात संगमेश्वर तालुक्यात 125 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. आत्तापर्यंत तालुक्यात एकूण 2600 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठ दिवसात पावसाने तालुकाभरात दीड लाखांचे नुकसान केले आहे. शुक्रवारी दुपारी तालुक्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. शुक्रवारी रात्रभर पाऊस अविश्रांत कोसळत होता. शनिवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने तालुक्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सोनवी, शास्त्री, गडनदी, बावनदी, सप्तलिंगी, काजळी आदी नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. शास्त्रीनदीचे पाणी काल संध्याकाळीच संगमेश्वर बाजारपेठेत घुसले. रात्रभर पडलेल्या पावसाने पाणी वाढण्याची भिती होती मात्र म्हणावे तितके पाणी आत शिरले नाही. पाण्याचा फटका आठवडा बाजार आणि रामपेठेला बसला आहे. अजुनही बाजारातील पाणी कायम आहे.
गडनदीला आलेल्या पुराचा फटका माखजन बाजारपेठेला बसला. आज सकाळीच पुराचे पाणी बाजारात घुसल्याने व्यापार्यांची तारांबळ उडाली. काल पावसाचे तानमान पाहून अनेकांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवला होता. खाडीभागात आलेल्या पुराने फुणगुस बाजारपेठेत पाणी घुसले आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. देवरूख – संगमेश्वर मार्गावर कोसुंब ते साडवली दरम्यान तळ्याचे रूप आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सायले येथे एका मोरीवरून सोनवी नदीचे पाणी वाहत असल्याने देवरूख – सायले मार्ग बंद ठेवण्यात आला. गोळवली येथील ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने संगमेश्वर – कुंभारखाणी मार्ग बंद पडला होता. याच मार्गावर गोळवली आमकरवाडी येथे दरड कोसळल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. नजिकच्या निवेखुर्द परबवाडी येथे रस्त्यावर दरड आल्याने देवरूख – कुंडी मार्गावरची वाहतूक बंद पडली आहे. आज दिवसभरातच पावसाने शंभरी गाठल्याने रात्रभर पाऊस असाच सुरू राहिल्यास तालुक्यातील पुरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.



























































