
दुर्गेश आखाडे । रत्नागिरी
ढगांच्या गडगडाटासह शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने रविवार गाजवला. दिवसभर पडणाऱ्या धो धो पावसाने रत्नागिरी जिल्हयाला झोडपून काढले. रत्नागिरी जलमय झाली असून जनजीवन विस्कळीत झाले. रत्नागिरी तालुक्यात शिरगाव, बसणी, कासारवेली, मिरजोळे, टेंभ्येसह रत्नागिरी शहर जलमय झाले. असंख्य घरामध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. देवरुखमध्ये कोंळबे चव्हाणवाडी येथे दरड कोसळण्याची भीती असल्याने परिसरातील ४० कुंटुंबाना स्थलांतरीत करण्यात आले. मांजरे गावात दरड कोसळयाने रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर कुरधुंडा येथे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
सुरुवातीच्या पावसाने कोकणाला दणका दिला. गेल्या २४ तासात रत्नागिरी जिल्हयात सरासरी १२८ मिमी पावसाची नोंद झाली.त्यामध्ये मंडणगड ५३ मिमी, दापोली ७७ मिमी, खेड ५८ मिमी, गुहागर १४० मिमी, चिपळूण १११ मिमी, संगमेश्वर ८५ मिमी, रत्नागिरी २३९ मिमी, लांजा १८७ मिमी, राजापूर तालुक्यात २०५ मिमी इतका पाऊस पडला. चिपळूण तालुक्यात महादेव धोंडकर यांचा गोठा कोसळून दौन बैल आणि एक वासरु जखमी झाले आहे.कापसाळ ग्रामपंचायतीसमोर वडाचे झाड कोसळून सुमारे तासभर वाहतूक ठप्प होती.झाड तोडून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.चिपळूण गुहागर महामार्गावर चिपळूण-चवेली ही रात्रीची बस दरड पडल्याने रस्त्यात अडकून पडली.रत्नागिरी तालुक्यात रनपार येथे नंदकुमार सुर्वे यांच्या घरात पाणी घुसुन नुकसान झाले.पूर्णगड येथे रामा डोर्लेकर यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे.कासारवेली येथील शाळेवर झाड पडून मोठया प्रमाणात नुकसान झाले.राजापूर तालुक्यात कशेळी येथे पांडूरंग पाटील यांच्या गोठयाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागून १२ हजार रुपयांचे नुकसान झाले.
शिरगाव,बसणी कासावेलीत हाहाकार…
अतिवृष्टीमुळे रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव,कासारवेली आणि बसणी गावामध्ये हाहाकार उडाला.मोठया प्रमाणात पाणी घरात शिरल्याने अनेक कुंटुंबाचे नुकसान झाले. कसारवेली,बसणी येथील रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. दोन तास रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प होती. अनेक वाहनचालक पाणी कमी होण्याची तासन तास प्रतिक्षा करत होते. टेंभ्ये परिसरातही पहिल्याच पावसात पूलावरुन पाणी जाऊन पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली.मिरजोळे गावातही अनेक घरामध्ये पाणी शिरले. रत्नागिरी शहरातमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मागील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला.कर्लेकर वाडीतील मोकळया मैदानात पाणी भरल्यामुळे येथील रस्त्यावरील वाहतूक धोकादायक बनली होती. रत्नागिरी शहरातील बाजारपेठेतही मोठयाप्रमाणात पाणी तुंबल्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला.























































