Latur News – मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील 39 मार्गांवरील वाहतूक प्रभावित

लातूरमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे (२७ ऑगस्ट) रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाले, ओढे यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुलावरून, रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने जिल्ह्यातील जवळपास ३९ रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित झाली आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाहनांची वाहतूक तात्पूरती बंद करण्यात आली आहे.

रस्ते अथवा पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही वाहनासह किंवा स्वतः पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे, असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत करण्यात आले आहे. प्रभावित झालेल्या रस्त्यांमध्ये पुढील रस्त्यांचा समावेश आहे.

माणकेश्वर, बोटकुळ, अतनूर यासह उदगीर बाराळी रस्ता बंद आहे. उटी व अलमला रस्त्यावर पुलावरून पाणी जात असल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक बंद आहे. बैठना येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अजनी ते उदगीर वाहतूक बंद आहे. एकंबा येथील पुलावर पाणी आल्यामुळे तसेच धडकनाळ बोरगाव मार्गावरही पुलावर पाणी आल्यामुळे उदगीर ते देगलूर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.