
हिमाचलप्रदेशची राजधानी असलेल्या शिमला आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात दोन दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत आहे. यामुळे रस्त्यांवर तीन तीन फूट बर्फ साचला असून तीनशेहून अधिक पर्यटक जागोजागी अडकले आहेत. त्यातही कुल्लू- सोलंग मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असून रस्त्यावर जमा झालेले बर्फाचे ढिगारे हटवण्याचे काम सुरू आहे.
रविवारी दुपारपासून मनाली व त्याच्या आजूबाजूच्या 7 इंच बर्फवृष्टीची नोंद करण्यात आली. गुलाबा, हनुमान टिब्बा, जलोडी व लाहौल, स्पिती, किन्नौर, कुफरी येथेही हिमवृष्टी झाली.
तर कुल्लू येथे पाऊसही कोसळत आहे. शिमला येथे 0.8 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर किन्नौरचे किमान तापमान 2.2 डिग्री सेल्सियस आहे.
जम्मू-कश्मीर राष्ठ्रीय महामार्ग बंद
कश्मीर खोऱ्यातही तुफान बर्फवृष्टी होत असून वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने वाहनकोंडी झाली आहे. येत्या 24 तासात मुसळधार पावसासह जोरदार बर्फवृष्टी होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.




























































