
कराड तालक्यातील हेळगाव येथील विकास सोसायटीत 2011 ते 2015 या कालावधीत बनावट कागदपत्रे सादर करून इमारत निधीच्या नावाखाली खाते उघडून बँक, सोसायटी व सभासदांची फसवणूक करीत 10 लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन चेअरमन व तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी जगदाळे, व्हाईस चेअरमन, सचिव, विकास अधिकारी, संचालक अशा 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सोसायटीचे तत्कालीन सचिव रामराव जयसिंग गायकवाड (रा. शिरगाव उंब्रज, ता. कराड), तत्कालीन चेअरमन शिवाजी रघुनाथ जगदाळे, व्हाईस चेअरमन बाबासाहेब गणपती चव्हाण, संचालक मधुकर रामचंद्र बानुगडे, अशोक मारुती चव्हाण, सुनील शंकर पाटील, व्हाईस चेअरमन सुभाष हरिबा पवार, प्रताप ज्योती सूर्यवंशी, संपतराव हंबीरराव पाटील (सर्व रा. हेळवाक, ता. कराड), विकास अधिकारी अशोक महादेव यादव (रा. कोळकेवाडी, पो. जिंती, ता. पाटण), भोजराज अनंत कांबळे (रा. काले, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आबा जगदाळे करीत आहेत.
हेळगाव विकास सेवा सोसायटीच्या नावे जिल्हा बँकेच्या हेळगाव शाखेत इमारत फडाचे खाते उघडल्यापासून उपनिबंधकांनी लेखापरीक्षक आनंदराव कणसे यांना चौकशीचे आदेश दिले होते. 28 जानेवारी 2021 रोजी संस्थेस व बँकेस लेखापरीक्षकांनी दप्तर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या दफ्तराची लेखापरीक्षकांनी तपासणी केली असता, 10 लाख 21 हजार 960 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर लेखापरीक्षक आनंदराव काकासाहेब कणसे यांनी उंब्रज पोलिसांत गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा नोंद केला.



























































