
सामना प्रतिनिधी । पुणे
समितीची बैठक, चौकाचौकामध्ये घोळक्याने वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्यांवर सुरू केलेली कारवाई आणि त्यातून होणारे वाद-विवाद… अशा परिस्थितीमध्ये २०१९च्या पहिल्याच दिवशी शहरात दुपारी चारपर्यंत तीन हजार दुचाकीस्वारांवर हेल्मेटची कारवाई करण्यात आली. दरम्यान, १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती नव्हतीच, असा पवित्रा पोलिसांनी घेतल्याने गेल्या दीड महिन्यापासूनच्या भूमिकेवर पोलिसांनी थेट ‘यू टर्न’ घेतला.
पुण्यात सुमारे १८ लाख इतकी दुचाकींची संख्या आहे. परंतु हेल्मेट वापरण्याचे प्रमाण अगदीच कमी आहे. हेल्मेट न वापरल्याने पुण्यात अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून हेल्मेटसक्ती केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात हेल्मेटसक्तीचा विषय वादग्रस्त बनला आहे. त्यामुळे १०-१५ दिवस कारवाई केली की होणाऱ्या विरोधामुळे पुन्हा पोलिसांकडून कारवाई गुंडाळली जाते.
पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी अचानक कारवाई न करता यावेळी पुणेकरांना हेल्मेटची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दीड महिना आधी पूर्वसूचना दिली. १ जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटची सक्ती होईल, असे सांगण्यात आले. त्यावरून वाद-विवाद सुरू असताना, पोलिसांची भूमिका अद्यापि बदललेली नाही.
आज १ जानेवारी रोजी शहरात सकाळपासून चौकाचौकामध्ये हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू केली. दुपारी चारपर्यंत तीन हजारजणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांपैकी दोन हजारजणांवर थेट कारवाई केली आहे; तर एक हजारजणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा एक लाख रुपयांचा दंड वसूल केला.
वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते म्हणाल्या, पूर्वी पोलीस आयुक्तांनी १ जानेवारी सांगितली होती; पण त्यानंतर त्यांनी ही कारवाई निरंतर सुरू राहील, असे सांगितले होते. हेल्मेटचा कायदा अस्तित्वात असल्याने नेमक्या एका तारखेची गरज नव्हती. २०१८मध्ये पुण्यात ५० ते ६० हजार हेल्मेटच्या केसेस आहेत. त्यांपैकी ३० हजार केसेस डिसेंबर महिन्यातील आहेत. आम्ही फक्त कारवाई कडक केली आहे. ती यापुढेही सुरूच राहील. आज दिवसभरात हेल्मेटच्या तीन हजारजणांवर कारवाई केली आहे. त्यांतील एक हजारजणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई केली आहे.































































