
सामना ऑनलाईन, पुणे
जिल्ह्यात कुठेही पाणी व चाराटंचाई निर्माण झाल्यास, तसेच दुष्काळासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच १०७७ या टोलफ्री व ०२०-२६१२३३७१ या संपर्क क्रमांकांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता गंभीर होत आहे. दुष्काळ व पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील चारा छावण्यांना २४ तासांत मंजुरी देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ तक्रार निवारण व आपत्तिव्यवस्थापनासाठी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत नागरिकांकडून दुष्काळाविषयी येणाऱ्या तक्रारींसाठी स्वतंत्रपणे नोंद घेतली जात आहे.
जिल्ह्यातील बारामती, शिरूर, जुन्नर, पुरंदर, आंबेगाव, दौंड तालुक्यांसह इतर ठिकाणी २०३पेक्षा अधिक टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जनावरांच्या चाऱ्याचीही तीव्र टंचाई असून, त्यासाठी बारामती तालुक्यात चार, तर शिरूरमध्ये दोन-चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी छावणी व पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची गरज आहे, त्या ठिकाणी तत्काळ सुरू केले जात आहेत.
































































