पॉर, पुर्रर्र….आवाज आला आणि आरोपी फसला, वाचा सविस्तर बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मिसुरी

आरोपीला पकडताना कोणत्या पुराव्यामुळे तो पकडला जाईल याचा नेम नसतो. अमेरिकेतील मिसुरी भागातील पोलिसांना एका आरोपीला त्यानेच केलेल्या आवाजयुक्त चुकीमुळे पकडण्यात यश आलं. ज्या पद्धतीने पोलिसांनी या आरोपीला पकडला ते वाचून लोकांचं प्रचंड मनोरंजन होतंय.

मिसुरी येथील क्ले काउंटी पोलीस विभाग गेल्या काही काळापासून या चोराचा शोध घेत होता. काही प्रतिबंधित औषध चोरून त्यांचा गैरवापर केल्याचा आरोप या चोरावर होता. मिसुरीतील एका परिसरात तो चोर लपून बसला असल्याचा संशय पोलिसांना होता. या संशयाची खात्री करून घेत पोलिसांनी शोधाशोध करायला सुरुवात केली. या शोधमोहिमेचा सुगावा लागलेल्या या चोराने पोलिसांपासून लपण्यासाठी झाडांचा आसरा घेतला. पोलीस त्याच्या अगदी जवळ पोहोचले होते, मात्र तो लपून बसल्याने त्यांना दिसत नव्हता. पोलीस शोध घेऊन परत जाणार तितक्यात आरोपी जोरात पादला. पोलिसांनी आवाजाच्या दिशेने शोधायला सुरुवात करताच त्यांना आरोपी दिसून आला. गॅसचा त्रास होत असलेल्या आरोपीला पकडल्याची पोस्ट पोलिसांनी फेसबुक आणि ट्विटरवर टाकली आहे, जी वाचून अनेकांची हसून हसून पुरेवाट झाली आहे. या आवाजामुळेच पोलिसांना तो लपून बसलेलं ठिकाण कळलं आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांनी या चोराच्या नावाबद्दल अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. पण, त्यांनी या गमतीशीर प्रकरणाबद्दल जी  पोस्ट व्हायरल केली ती धमाल पोस्ट वाचून नेटकऱ्यांनीही त्याला तुफान प्रतिसाद दिला आहे.