
देशातील सर्वात मोठ्या नक्षलवादी चळवळीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. PLGA (‘पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी’ ) बटालियनचा जहाल नक्षलवादी कमांडो हिडमा माडवी याचा सुरक्षा दलांनी खात्मा केला. त्यानंतर ही चळवळ चांगलीच हादरली आहे. अशातच आता त्याचा विश्वासू साथीदार बारसे देवा शरणागती पत्करण्याच्या तयारीत आहे. बारसे देवा जंगलातून सुरक्षित बाहेर येण्यासाठी सुकमा परिसरात एक कॉरिडोअर तयार करण्यात आला आहे. तो सरेंडर झाल्यास नक्षलवाद्यांची बटालियन जवळपास संपुष्टात येईल असे म्हटले जात आहे.
आंध्र प्रदेशातील अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यातील एका एन्काऊंटरमध्ये जहाल नक्षलवादी कमांडो हिडमा माडवी याचा सुरक्षा दलाने खात्मा केला. हिडमा याच्या मृत्यूनंतर बस्तरची नक्षली संघटना चांगलीच हादरली आहे. हिडमा बस्तरच्या लोकल नेटवर्कला माद्योवाद्यांशी जोडणारा महत्वाचा दुवा होता.
हिडमा आणि बारसे देवा दोघेही सुकमाच्या पूर्वी गावाचे आहेत. दोन वर्षांपूर्वी हिडमाला सेंट्रल कमेटीमध्ये सहभागी करण्यात आले, तर त्याने बारसे देवाला PLGA बटालियन नंबर 1 चा कमांडर बनवला. मात्र हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी चळवळीला धक्का बसला आहे.




























































