
सामना प्रतिनिधी, मुंबई
भायखळा तुरुंगातील वॉर्डन मंजुळा शेटय़े हिच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तुरुंग अधिकारी मनीषा पोखरकर यांच्यासह सहाजणांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या आरोपींना दिलासा देण्यास आज मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. खटल्याला विलंब होत असेल तर आम्ही नियमित सुनावणी घेण्याचे सत्र न्यायालयाला आदेश देऊ. त्यासाठी जामीन अर्ज मागे घ्या, असे न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी स्पष्ट केले व या प्रकरणावरील सुनावणी 17 जूनपर्यंत तहकूब केली.
24 जून 2017 रोजी मंजुळा शेट्ये हिला भायखळा तुरुंगातील महिला कारागृह रक्षकांनी किरकोळ कारणावरून जबर मारहाण केली होती. या मारहाणीत मंजुळा शेट्ये हिचा मृत्यू झाला. तुरुंगातील अन्य महिला कैद्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी कारागृह अधीक्षक मनीषा पोखरकरसह बिंदू नायकवडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे यांना अटक केली. जामिनासाठी या आरोपींनी सत्र न्यायालयात अर्ज केला परंतु सत्र न्यायालयाने त्यांचा हा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे या आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज दाखल केला.
आरोपींच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी कोर्टाला सांगितले की, सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असून आतापर्यंत एकच साक्षीदार तपासून झाला आहे. त्यामुळे सुनावणी लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. सरकारी वकिलांनी सांगितले, लवकर सुनावणी घेण्याबाबत प्रयत्न केला जाईल. त्यावर याचिकाकर्त्यांनीही खटल्याची प्रगती पाहून न्यायमूर्तींना आदेश देण्याची विनंती केली.


























































