
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीर विधानसभा बरखास्त करण्याचा राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निर्णयानंतर राजकीय धुमश्चक्री सुरू झाली आहे. राज्यपाल आणि राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱया सुरू आहेत. या अत्यंत संवेदनशील राज्यात राजकीय अराजक माजण्याची शक्यता आहे.
राज्यपाल राजवट असलेल्या जम्मू-कश्मीरात बुधवारी नाटय़मय घडामोडी घडल्या. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांची काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या पाठिंब्यावर सरकार स्थापण्याचा दावा केला आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांना ट्विटद्वारे पत्र पाठविले. त्यानंतर 15 मिनिटांतच पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन यांनी भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापण्याचा दावा करून व्हॉट्सऍपद्वारे राज्यपालांकडे पत्र पाठविले. त्यानंतर काही तासांत राज्यपाल मलिक यांनी विधानसभाच बरखास्त केली. यामुळे आता जम्मू-कश्मीरात राजकीय धुमश्चक्री सुरू झाली आहे.
पैशांचा वापर; घोडेबाजार सुरू होता – राज्यपाल
– आज पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल मलिक यांनी विधानसभा बरखास्त करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना आमदारांना पैसे दिले जात होते, धमक्या मिळत होत्या, घोडेबाजार सुरू होता, असे आरोप केले.
– मेहबुबा मुफ्तींनी ट्विट केले; पण सोशल मीडियाद्वारे सरकार बनते का? मी ट्विट करीत नाही आणि वाचतही नाही.
– काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीने न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे. हे कोर्टात काय जाणार? विधानसभा बरखास्त करावी ही मागणी पाच महिन्यांपासून हेच करीत होते.
– फॅक्स मशीन चालत नव्हते; पण फॅक्सद्वारे पत्र मिळाले असते तरी मी बरखास्तीचा निर्णय घेतला असता.
– आपल्या आमदारांना धमकावले जात असल्याची तक्रार मेहबुबा मुफ्ती यांनीच माझ्याकडे केली होती.
…हा तर लोकशाहीचा खूनच – काँग्रेस
– विधानसभा बरखास्त करण्याचा राज्यपालांचा निर्णय घटनाबाह्य आणि लोकशाहीचा खून करणारा आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते मनीष निवारी यांनी केली.
– पीडीपी-काँग्रेस-एनसी यांना सरकार बनवू दिले नाही. राज्यपालांच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात आव्हान देऊ, असे काँग्रेसने स्पष्ट केले.
राजभवनातील फॅक्स मशीन बंद होते हा मुद्दाच नाही. काल ईद होती आणि मला जेवण देण्यासाठीसुद्धा राजभवनावर कोणी उपलब्ध नव्हते – सत्यपाल मलिक, राज्यपाल
अजबच फॅक्स मशीन आहे. आऊटगोईंग सुरू पण इन्कमिंग नाही. पहिल्यांदाच घडले की, फॅक्स मशीन बंद असल्यामुळे लोकशाहीचा खून झाला आहे. – ओमर अब्दुल्ला, अध्यक्ष, नॅशनल कॉन्फरन्स
पीडीपी-भाजप एकत्र आले तेव्हा प्रश्न पडले नव्हते – ओमर
– जेव्हा पीडीपी-भाजप एकत्र आले तेव्हा प्रश्न पडले नव्हते. आताच पीडीपी-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी एकत्र आल्यास प्रश्न विचारले का जात आहेत, असा सवाल नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी केला.
– आमदारांचा घोडेबाजार होत होता तर राज्यपालांनी पुरावे द्यावे. गुप्तचरांचा अहवाल जाहीर करावा. केवळ आरोप करू नयेत, चौकशी करावी.
– राजभवनातील फॅक्स मशीन बंद असण्याची पहिलीच घटना आहे. ही अजब फॅक्स मशीन आहे. आऊटगोईंग सुरू आणि इन्कमिंग बंद. लोकशाहीची हत्या करण्यास फॅक्स मशीन जबाबदार आहे.



























































