
हिमाचल प्रदेशातील धर्मशालाचे भाजप आमदार विशाल नेहारिया यांनी आपला मानसिक आणि शारीरिक छळ करीत आपल्याला घराबाहेर काढल्याची तक्रार आमदाराची अधिकारी पत्नी ओशिन शर्मा यांनी सोशल साईट्सवर व्हिडीओ व्हायरल करीत केली आहे. ओशिन या हिमाचल प्रदेश प्रशासनिक सेवेतील (एचपीएएस) अधिकारी आहेत. आपल्या आमदार पतीने आपल्याला सर्वांसमोर गुरुवारी तीन थपडा लगावत अपमानित केले. यापूर्वीही आपल्या पतीने आपला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार ग्रामीण विकास विभागात विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या ओशिन यांनी केली आहे. ओशिन यांचा विवाह दोन महिन्यांपूर्वीच भाजप आमदार नेहारिया यांच्याशी झाला आहे. पण आता आपल्याला हुंडय़ासाठी छळून जबरदस्तीने माहेरी धाडण्यात आल्याचा आरोप ओशिन यांनी केला आहे. साध्या त्या माहेरीच मुक्कामाला आहेत.

























































