‘हिमालय’ दुर्घटनेने स्ट्रक्चरल ऑडिट झाले ‘कडक’, पुलांचे ‘बजेट’ आठ कोटींनी वाढले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमालय पूल दुर्घटनेमुळे मुंबईतील सर्वच पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पुन्हा केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये मोठी दुरुस्ती सुचवण्यात आल्याने आठ पुलांच्या खर्चातही तब्बल आठ कोटी 26 लाख रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये महालक्ष्मी रेल्वे ब्रीज, दादर फूल मार्केट, टिळक ब्रीजजवळील उड्डाण पूल आणि दादर-धारावी नाल्यावरील पुलांच्या मोठय़ा दुरुस्तीचा समावेश आहे.

मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिकेची संपूर्ण यंत्रणा कोविड रोखण्यासाठी काम करीत आहे. मात्र कोरोना लढय़ातही रस्ते, पूल आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कामेही पालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत.

यामध्ये महत्त्वाचे काम म्हणजे पुलांची दुरुस्तीही वेगाने सुरू आहे. अंधेरीत जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल 14 मार्च 2019 रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला.

त्यामुळे पालिकेने धोकादायक पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम वेगाने हाती घेतले आहे. यामध्ये शहर परिमंडळ – 2 प्रभागातील पुलांची दुरुस्ती मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे. या आठ पुलांच्या दुरुस्तीसाठी 15 कोटी 33 लाख 53 हजार 231 रुपये खर्च येणार होता. मात्र नव्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार कामाच्या स्वरूपात आणि किमतीमध्ये वाढ झाल्याने हा खर्च 23 कोटी 60 लाख 23 हजार 330 रुपये खर्च होणार आहे. म्हणजेच मूळ खर्चात 8 कोटी 84 लाख 3 हजार 471 रुपयांची वाढ झाली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे.

या पुलांची होणार दुरुस्ती

महालक्ष्मी रेल्वे स्थानक पूल

करी रोड रेल्वे स्थानक पूल

शीव रेल्वे स्थानक पूल

शीव हॉस्पिटल येथील पूल

टिळक पूल दादर येथील उड्डाण पूल

दादर फूल मार्पेट पूल

माहीम फटक पूल

दादर-धारावी नाल्यावरील पादचारी पूल

…म्हणूनच वाढला खर्च

खर्च वाढलेल्या आठ पुलांच्या दुरुस्तीचे काम पालिकेने नेमलेल्या कंत्राटदारामार्फत सुरू करण्यात आले होते. मात्र ऑडिटरने ‘वेल कंडिशन’मध्ये असल्याचा रिपोर्ट दिलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय ब्रीज कोसळल्याने सर्वच पुलांच्या ऑडिटवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

त्यामुळे मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यानुसार काम सुरू असलेल्या संबंधित आठ पुलांच्या कामात वाढीव दुरुस्ती सुचवण्यात आली असून त्या दृष्टीने आवश्यक काम करण्यात येत आहे.