
साताऱ्यात रंगलेल्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ या मराठमोळ्या मल्लांमध्ये फायनल झाली, ‘मात्र या किताबी लढतीत महेंद्रने जाणीवपूर्वक माझा हात मोडण्याचा प्रयत्न केला. रडीचा डाव खेळून तो हिंद केसरी झाला आहे’, अशी टीका पृथ्वीराज मोहोळने केली.
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि तीन वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यातील हिंद केसरी किताबाची लढत रंगतदार होईल, या आशेने साताऱ्यातील लाल मातीच्या आखाडय़ावर कुस्ती शौकिनांचाच महासागर लोटला होता. या लढतीत महेंद्रने पहिल्या मिनिटालाच एकेरी पटात घुसून पृथ्वीराजवर पकड घेतली, मात्र पाठीवर स्वार होत दोन गुणांची कमाई करणाऱ्या महेंद्रने पृथ्वीराजचा हात पिरगळला. त्यामुळे जायबंदी झालेल्या पृथ्वीला पुढे कुस्ती करता आली नाही. पृथ्वीराजच्या माघारीमुळे पंचांनी महेंद्र गायकवाडला हिंद केसरी किताब बहाल केला.
हिंद केसरी स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर जायबंदी झालेल्या पृथ्वीराज मोहोळने दवाखान्यातून घरी परतल्यानंतर महेंद्र गायकवाडवर टीका केली. ‘माझ्या हाताला फ्रॅक्चर झाले असून, लिंगामेंटही तुटल्या आहेत. महेंद्रने किताबी कुस्तीत अखिलाडूपणाचा कळस केला. कुस्ती सुरू असताना त्याचे वस्तादही पृथ्वीराजचा हात सोडू नको. आणखी मागे खेच असे ओरडत होते. सगळ्या दुनियेने आमची कुस्ती पाहिली आहे. रडीचा डाव खेळून महेंद्र हिंद केसरी झालाय. माझे वय अजून खूप कमी आहे. मी पुन्हा जोमाने तयारीला लागणार आहे. हिंद केसरी किताबाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी जिवाचे रान करीन, असा निर्धार पृथ्वीराजने व्यक्त केला.


























































