हिंगोलीत लाडक्या बहिणींची पंचाईत!फडणवीसांच्या सभेसाठी भाजपकडून मरमर, मिंध्यांच्या आमदाराची वंजारवाड्यात येण्यासाठी रडारड

भाजप आणि मिंध्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे हिंगोलीत लाडक्या बहिणींची मोठी पंचाईत झाली आहे. गुरुवारी होणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेला लाडक्या बहिणींनी गर्दी करावी म्हणून भाजपकडून मरमर करण्यात येत आहे, तर दुसरीकडे मिंधे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी भाजपकडून आपल्यावर जुलूम होत असल्याची रडारड सुरू केली असून, लाडक्या बहिणींना आपल्याला पाठबळ देण्यासाठी वंजारवाड्यात येण्याची गळ घातली आहे.

हिंगोलीत भाजप आणि मिंध्यांमधला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली सूचनाही धाब्यावर बसवून मिंध्यांचे आमदार संतोष बांगर यांनी भाजपला सुरूंग लावणे सुरूच ठेवले आहे. एवढेच नाही तर भाजपच्या उमेदवारांना मैदानातून माघार घ्यायला लावून मिंध्यांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी प्रचंड दहशत निर्माण करण्यात आली आहे. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने मिंध्यांसमोर गुडघे टेकले असून या सर्व पार्श्वभूमीवर आज हिंगोलीत होणार्‍या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात, याकडे हिंगोलीकरांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महात्मा गांधी चौकात दुपारी तीन वाजता सभा होणार असून लाडक्या बहिणींनी सभेला गर्दी करावी यासाठी भाजपचे कार्यकर्ते जिवाचे रान करीत आहेत. तर दुसरीकडे मिंध्यांचे आमदार संतोष बांगर यांनी भाजप आपल्यावर पोलिसांच्या मदतीने जुलूम करीत असून पहाटे आपल्या घराची झाडाझडती घेण्यात आल्याचा आरोप केला. कुणाच्या सांगण्यावरून पोलीस आपल्या घरी आले? असा सवालही त्यांनी केला. या जुलुमाच्या विरोधात दुपारी तीन वाजता महिलांनी आपल्याला पाठबळ देण्यासाठी वंजारवाड्यात यावे, असे आवाहनही त्यांनी केले. भाजप आणि मिंध्यांच्या संघर्षात लाडक्या बहिणींची मात्र मोठी पंचाईत झाली आहे.

आमदार संतोष बांगर म्हणजे हिंगोलीला लागलेला कलंक

हिंगोली जिल्ह्यात मटका, जुगाराचे अड्डे चालवून तरुणांची पिढी बरबाद करणारे आमदार संतोष बांगर म्हणजे हिंगोलीला लागलेला कलंक असल्याचा हल्लाबोल भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला. नगरपालिकेच्या निवडणुकीत मिंधे गट चौथ्या क्रमांकावर फेकला जाईल, असे भाकीतही त्यांनी केले.