
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, हिंगोली, वसमत या तीन मतदारसंघातुन 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून 21 उमेदवारांनी आज 7 ऑक्टोबर रोजी शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकारांशी बोलतांना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, हिंगोलीतुन शिवसेनेचे रामेश्वर शिंदे यांनी तर कळमनुरीतुन युती धर्म पाळत भाजपचे माजी खासदार शिवाजी माने व माजी आमदार गजानन घुगे यांनी अर्ज मागे घेतले आहेत. मात्र, वसमतला भाजपचे अॅड. शिवाजी जाधव यांनी महायुतीशी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
नांदेड – 9 विधानसभा मतदारसंघात 135 उमेदवार, ‘येथे’ होणार चुरशीच्या लढती
वसमत विधानसभा मतदारसंघात छानणीनंतर 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले होते. त्यापैकी 9 उमेदवारांनी आज 7 ऑक्टोबर या नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी मागे घेतली आहे. वसमतमध्ये रिंगणात राहिलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, राष्ट्रवादीचे चंद्रकांत नवघरे, वंचित बहुजन आघाडीचे मुनीर पटेल यांच्याशी 12 उमेदवार नशीब आजमवणार आहेत. वसमतला भाजपचे शिवाजी जाधव यांनी अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली आहे.
लातूर – 6 विधानसभा मतदारसंघामध्ये 79 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये 17 उमेदवारांपैकी 10 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून यामध्ये भाजपचे माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजाननराव घुगे, विनायक भिसे, दिलीप मस्के यांचा समावेश आहे. तर शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. संतोष टारफे, वंचित बहुजन आघाडीचे अजीत मगर यांच्यासह सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
हिंगोली मतदारसंघामध्ये 16 पैकी शिवसेनेचे माजी कृऊबा सभापती रामेश्वर शिंदे यांनी युतीधर्म पाळत उमेदवारी मागे घेतली असून बाबाराव आगलावे या अपक्ष उमेदवारानेही अर्ज परत घेतला. हिंगोलीतुन रिंगणात राहिलेल्या 14 उमेदवारात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा आमदार तानाजी मुटकुळे, काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, प्रहार जनशक्तीचे अॅड. विजय राऊत, वंचित बहुजन आघाडीचे वसीम देशमुख यांचा समावेश आहे.
दरम्यान, तीनही विधानसभा मतदारसंघात निवडणुक लढविणाऱ्या राष्ट्रीय, राज्यस्तरीय, मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवारांना त्यांचे विहित चिन्ह तसेच अपक्षांना चिन्हवाटप करण्याची प्रक्रिया पुर्ण झाल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.





























































