
कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलाव अधिक सुंदर बनविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा न्यू पॅलेस येथे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची कौटुंबिक भेट घेतली. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास त्यांनी ऐतिहासिक रंकाळा तलावाला भेट देऊन पाहणी केली. दरवर्षी लाखो पर्यटक देश-विदेशांतून येथे पर्यटनासाठी येतात. त्यांना उपलब्ध सुविधा, तसेच जिह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आवश्यक प्रकल्पांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली.
दरम्यान, कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणाऱया रंकाळा तलावाला अधिक सुंदर बनविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आज सकाळी आपल्या ट्विटमधून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. त्यामुळे रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त करण्यासह तलावाचे सौंदर्य खुलण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
पर्यटनक्षेत्राकडे जाणाऱया रस्त्यांसाठी भरीव निधी देण्याची मागणी
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील तीर्थक्षेत्रे रामलिंग, धुळोबा, अलंप्रभू, कुंतुगिरी, ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र असणारे बाहुबली ‘पर्यटन विकास योजने’अंतर्गत भरीव निधी उपलब्ध करण्याची मागणी माजी आमदार तथा ‘गोकुळ’चे संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.
पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली असून, रासायनिक सांडपाण्यामुळे नदीकाठच्या लाखो ग्रामस्थांचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे नदी प्रदूषण थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.
‘महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रांत आघाडीवर ठेवण्यासाठी आणि चांगली समाजसेवा करण्याचे सर्वांना बळ दे,’ असे साकडे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचरणी घातले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, राजेश क्षीरसागर उपस्थित होते. देवस्थान समितीच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदित्य ठाकरे यांचा सत्कार केला.




























































