गुढीपाडवा – हिंदूंच्या नववर्षदिनाचा इतिहास व महत्व !

>>  निळकंठ कुलकर्णी

अवधर्माची अवधि तोडी । दोषांची लिहिली फाडी।

सज्जनाकरवी गुढी । सुखाची उभवि ।

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्ररातील  एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरुवात गुढी पाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिके प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचे स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरी गुढी उभारून गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या, देखावे आणि शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं.

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैंकी एक आहे. इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी  मुहूर्त पहावा लागतो; पण या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसातील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.

गुढीपाडवा इतिहास-

गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. महाभारताच्या आदीपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिची पुजा केली. या परंमपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पूजन केले जाऊ लागले.इतिहासात या दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे.

पौराणिक कथेनुसार ज्या दिवशी श्रीराम रावण वधानंतर आयोध्येला परत आला, त्यादिवशी रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतिक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज ) उभारली होती. विजयाचे प्रतिक हे उंच असते म्हणून गुढी उंच उभी केली जाते.

एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि तृतीयेला झालं होतं. म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पूजा केली जाते.

गुढीपाडव्याचे महत्व –

गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडत असले तरी आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. आजच्या आधुनिक युगातही या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्टय़ा विशेष महत्व आहे. म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुढीपाडवा सणाचं महत्व जाणून घेणं फार गरजेचं आहे.

वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे पूर्वजांचे काही उद्देश असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते,  आंब्याला मोहोर येतो यांचं प्रतिक म्हणूनच गुढीला आंब्याची डहाळी बांधली जातात. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलांचे स्वागत करण्याची पद्धत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढी मध्ये कडुलिंबाची पाने लावली जातात.    प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग,मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारण, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं. कडुलिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडूनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळकेली जाते. ती वाटून खाल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो.

गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अशा अनेक गोष्टीना विशेष महत्व असतं.

गुढी उभारण्याची पद्धत –

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो. एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते. त्याला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या, कडुलिंब, आंब्याची पाने,चाफ्याच्या फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते. घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते. गुढी हे स्नेहाचे, मांगल्याचे,उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते. त्यामधून विजयीपताका उभारल्याचा आनंद व्यक्त होत असतो.

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या