#Article370 मोदी सरकारने अनर्थकारी निर्णय घेतलाय – चिदंबरम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याची शिफारस केली. यानंतर संसदेत गोंधळ उडाला. यादरम्यान काही पक्षांनी याला समर्थन दिले आहे, तर काहींनी विरोध केला आहे. बसपा, एआयएडीएमके, वायआरएस काँग्रेस, आम आदमी पक्ष, बिजू जनता दल आणि टीडीपी पक्षाने याला समर्थन दिले आहे, तर काँग्रेस, पीडीपीने विरोध केला आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि पी. चिदंबरम यांनी याला विरोध केला आहे.

राज्यसभेतील काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपने राज्यघटनेही हत्या केल्याचा आरोप केला आहे. आझाद यांच्यापाठोपाठ पी. चिदंबरम यांनी सुद्धा कलम 370 हटवण्याच्या आणि जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. मोदी सरकार जम्मू-कश्मीरच्या बाबतीत काहीतरी अतिधाडस दाखवणार याचा आम्हाला आधीपासूनच अंदाज होता. पण इतका अनर्थकारी निर्णय घेतील असे वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया चिदंबरम यांनी व्यक्त केली.

तसेच चिदंबरम पुढे म्हणाले की, तुम्हाला आत्ता वाटेल की आपण विजय मिळवला आहे, परंतु हे चुकीचे असून इतिहास तुम्हाला चुकीचा असल्याचे सिद्ध करेन. तुम्ही किती मोठी चूक केली आहे हे भावी पिढ्यांना समजेल.