
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
गुजरातमधील सूरत येथे एका 9 वर्षांच्या मुलीवर एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या 35 वर्षीय शेजाऱ्याने बलात्कार केल्याची भयंकर घटना घडली आहे. आरोपी टेलर असल्याने त्याने ड्रेसचे माप घेण्याच्या बहाण्याने मुलीला दुकानात बोलावले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली असून पोक्सो कलमाअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी सुरेशला (नाव बदलले आहे) एचआयव्हीची लागण झाली आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुलंही आहेत. त्याची चार वर्षाची मुलगी व पीडित मुलगी मैत्रिणी आहेत. त्यामुळे दोन्ही कुटुंबाचे एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. याचाच गैरफायदा घेत सुरेशने काही दिवसांपू्र्वी पीडित मुलीला ड्रेसचे माप घेण्याच्या बहाण्याने दुकानात बोलावले. त्यानंतर त्याने मोबाईलवर तिला अश्लील चित्रफितही दखवली. मुलीने ती बघण्यास विरोध केल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला व कोणालाही सांगू नकोस असे बजावत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलगी हादरली होती. जीवाच्या भीतीने तिने कोणासही काही सांगितले नाही. मात्र या घटनेनंतर ती घरात कोणाबरोबरही बोलत नव्हती. सतत भेदरलेली दिसत होती. आईने तिला अनेकवेळा कारणही विचारले पण तिने काहीही सांगितले नाही. पण दोन दिवसांपूर्वी शाळेतून घरी आल्यानंतर ती अचानक ओक्साबोक्शी रडू लागली. यामुळे आईने तिला विश्वासात घेऊन कारण विचारले. तेव्हा पीडित मुलीने आईला सर्व घटना सांगितली.
मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे कळताच मुलीच्या घरातल्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी सुरेशला अटक केली असता चौकशीदरम्यान त्याने तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले.


























































