
होळीचा सण सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वत्र ‘कोरोना’चे सावट असल्याने खबरदारीचे आवाहन केले जात असताना सर्वांनी उत्साहात पारंपरिक पद्धतीने होळी पेटवून तसेच रंगांची धुळवड करत सण साजरा झाला. होळीला प्रत्येक वाडीत ग्रामस्थ एकत्र येत पारंपरिक ठिकाणी होळी पेटवतात. काही ठिकाणी घरोघर फिरून लाकडे गोळा करतात. काही गावात मानाची होळी असते. होळीसाठी वापरले जाणारे झाड गावात फिरवले जाते. शेकडो ग्रामस्थ यात सहभागी होतात.
होळीला गाऱ्हाणे घालताना मालवण धुरीवाडा महापुरुष मंदिर येथील नागरिकांनी ‘कोरोना’चे संकट दूर होऊदे. मालवणात कोरोना येऊच नये, असे साकडे घातले. मंगळवारी दिवसभर रंगांची उधळण करत धुळवड साजरी करण्यात आली. सकाळपासूनच बच्चे कंपनीसह तरुणाई रस्त्यावर उतरवून रंगांची होळी साजरी करत होती. पारंपरिक रंग, पाण्याचे फवारे तर काही ठिकाणी गाण्यांचा ठेका असा उत्साह होता.




























































