
सामना ऑनलाईन, नगर
नगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन तरुण कार्यकर्त्यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची तुरुंगात घरच्यासारखी सोय करण्यात आल्याचं उघड झालंय. पोलिसांच्या कृपेमुळे या आरोपींना चिकन-मटणाचं जेवण मिळत असल्याचं हत्याकांडात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी पुराव्यानिशी सिद्ध केलं आहे. या आरोपींसाठी तुरुंगात डबे जात असताना मयत राकेश राळेभात आणि योगेश राळेभात यांच्या नातेवाईकांनी ते पकडले ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना बोलवून पंचनामा करण्यात आला. तहसीलदारांनी आता दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस योगेश अंबादास राळेभात (३०) आणि राष्ट्रवादी युवकचा कार्यकर्ता राकेश अर्जुन राळेभात (वय २६, दोघेही रा. मोरेवस्ती, जामखेड) यांची २८ एप्रिल रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तालमीत राजकीय बोर्ड लावण्याच्या वादातून उल्हास मानेच्या सांगण्यावरुन हत्या केल्याची फिर्याद देण्यात आली होती. हत्याकांडानंतर उल्हास माने फरार होता. पोलिसांनी मानेसह गोळ्या घाडणाऱ्या गोविंद गायकवाड आणि अन्य आरोपींना अटक केली आहे.




























































