‘होम क्वारंटाइन’मधील संशयित फिरतोय, सर्दी-खोकल्यामुळे ‘कोरोना’चा संशय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कोरोना प्रभावित देशातून आलेला प्रवासी हातावर शिक्का असूनही खुलेआम फिरतोय, सर्दी-खोकला सुरू आहे, कधी कधी ताप आल्याने ‘कोरोना’चा संशय येतोय’ अशा तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागातील ‘1916’ क्रमांकावर येत आहेत. या ठिकाणी 24 तास उपलब्ध असणारे पालिकेचे तज्ञ डॉक्टर नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करीत आहेत. यामध्ये 15 दिवसांत तब्बल दहा हजारांवर तक्रारी या ठिकाणी आल्या आहेत.

‘कोरोना’बाबत कोणतीही शंका असल्यास  माहिती देण्यासाठी पालिकेने ‘1916’ हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. 6 मार्चपासून पालिका मुख्यालयातील आपत्कालीन विभागात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या सहा दिवसांत येणाऱया फोन कॉलचे प्रमाण सुमारे साडेचारशे ते सातशेच्या दरम्यान होते. मात्र आता दररोज येणाऱया फोन कॉलचे प्रमाण तब्बल अकराशेवर गेली आहे. गेल्या तीन दिवसांत तर प्रतिदिन सरासरी तब्बल एक हजार कॉल येत आहेत. या ठिकाणी उपलब्ध असणाऱया डॉक्टरांकडून नागरिकांच्या शंकांचे निरसन केले जात असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

‘होम क्वारंटाइन’ सोडून फिरणाऱयांवर नजर

‘कोरोना’च्या प्रभावित देशांमधून आलेल्या प्रवाशांचे विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग सुरू आहे. यामध्ये लक्षणे दिसली नसली तरी प्रवाशांच्या हातावर शिक्का मारून 14 दिवस ‘होम क्वारंटाइन’मध्ये राहण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. मात्र यामधील अनेक जण खुलेआम फिरत असल्याच्या तक्रारीही  पालिकेच्या आपत्कालीन विभागात येत आहेत. अशा लोकांची माहिती तातडीने पोलिसांना कळवून त्यांना सक्तीने ‘क्वारंटाइन’मध्ये पाठवण्यात येत असल्याची माहिती आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

आज आणखी एक पोलिसांच्या ताब्यात

‘होम क्वारंटाइन’साठी शिक्का मारलेल्या व्यक्तीला बाहेर फिरण्यास मज्जाव असताना काही जण बाहेर फिरत आहेत. शनिवारी गुंदकली पोलिसांकडून बेस्ट बसमधून प्रवास करणाऱया एकाला ताब्यात घेऊन क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आले. सकाळी 9.30 च्या सुमारास गोराई आगाराहून कुर्ला स्थानक पश्चिम येथे जाणाऱया ‘बेस्ट’च्या 309 मर्यादित क्रमांकाच्या बसमध्ये स्टॅम्प मारलेली ही व्यक्ती प्रवास करीत असल्याचे आढळले होते.