
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
चंद्रपूरपासून ७ किलोमीटर अंतरावर विसापूर टोलनाक्या समोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्मिळ चांदी अस्वलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या चांदी अस्वलाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे.
राष्ट्रीय महामार्गावर विसापूर कडून बल्लारशा कडे जातांना टोलनाक्यापासुन १०० मीटर अंतरावर एक प्राणी मृत अवस्थेत असल्याचे नागरिकांना दिसून आले, लगेच घटनेची माहिती मिळताच हॅबिटॅट कॅनसर्वेशन सोसायटी चे राहुल चिलगिरवार घटनास्थळी पोहोचले व वनविभागाचे डी. बी टेकाम घटनास्थळी उपस्थित होते.
चांदी अस्वल हि वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १९७२ परिशिष्ट १ मधील प्रजाती असून तो निशाचर प्राणी आहे, हा प्राणी मांसाहारी आहे, व स्वभावाने अतिशय रागीट आहे, अंगावर जाड कातडी असल्यामुळे इतर जनावर याच्यापासुन लांब राहतात आणि अन्य हिंस्र प्राणी याच्यावर हल्ला करण्यापासून दूर राहतात.
भारतात विकासाच्या नावावर जंगलातून जाणाऱ्या मार्गावर कुठल्याही प्रकारचा वन्यप्राण्यांचा विचार न करता मोठं मोठे रस्ते बांधण्याचा सपाटा सुरु आहे, त्याचेच परिणाम वाहनाच्या धडकेत वन्यप्राण्यांच्या मृत्यूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. याच मार्गावर मागच्या वर्षी एका अस्वलाचा तिच्या दोन पिल्लांसह अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. अनेक नागरिकांनी या मार्गावर वाघ, बिबटे रस्ता ओलांडताना पाहिले आहे. भविष्यात वाघाचा सुद्धा अपघातात मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा घटना टाळण्यासाठी शासनाने वन्यप्राण्यांना रास्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

























































