चाकण – वीटभट्टी मजूर मालकाच्या मुलीसोबत पळून गेला, तरुणासह मित्राची केली हत्या

पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये दुहेरी हत्याकांडांची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणामधून एका तरुणाला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्येच या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मरण पावलेल्या तरुणांची नावं बाळू सीताराम गावडे आणि राहुल दत्तात्रय गावडे असं आहे.

बाळू हा एका वीटभट्टीवर कामाला होता. या वीटभट्टीच्या मालकाची मुलगी 14 तारखेला बाळूसोबत बळून गेली. मालकाची मुलगी पळवून नेण्यासाठी बाळूला राहुलने मदत केली. यानंतर विटभट्टी मालकाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दोन दिवस शोध घेत या तिघांना शोधून काढलं. गुरुवारी या तिघांचा शोध लागल्यानंतर त्यांना विटभट्टी मालकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केली. आरोपींनी लाकडी दांडके, लोखंडी रॉर्ड्सने या दोघांना बेदम मारहाण केली. याच मारहाणीमध्ये गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाला.

बाळूसोबत पळून गेलेल्या मुलीलाही मारहाण करण्यात आली आहे. ही मुलगीही जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या मुलीच्या वडिलांसहीत सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या सहा जणांना ताब्यात घेऊन प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. नक्की घटनाक्रम कसा घडला यासंदर्भातील तपासही पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या