
सामना प्रतिनिधी । मुंबई
महाबळेश्वर, माथेरानसारख्या हिल स्टेशनवर विशेष करून हृदयविकार तसेच अपघातातील जखमींवर उपचारसंबंधी यंत्रणा उपलब्ध देण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. तसेच ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला व बाल रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याबरोबर रिक्त पदांची तत्काळ भरती करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
राज्यातल्या ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी योजण्यात येणाऱया उपाययोजनांचा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला. या आढावा बैठकीला ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मनोहर भोईर, राजेश क्षीरसागर, किशोर पाटील, सुनील शिंदे आदी उपस्थित होते. दरम्यान, राज्यातील ज्या आरोग्य संस्थांच्या इमारतींचे बांधकाम 50 चे 60 टक्के पूर्ण झाली आहेत अशा संस्थांची कामे पूर्ण होण्यासाठी वित्तमंत्र्यांकडे मागणी करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
कामगार रुग्णालयाचे आधुनिकीकरण
महाबळेश्वर, माथेरान यासारख्या पर्वतीय पर्यटनस्थळी आरोग्य व्यवस्था विशेष करून हृदयविकार तसेच अपघातातील जखमींवर उपचारसंबंधी यंत्रणा उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना सूचना दिल्या. खासगी संस्था, कॉर्पोरेटस्च्या माध्यमातून सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) उपलब्ध करून राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये सीटी स्कॅन, एमआरआय यासारखी यंत्रसामुग्री बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही आरोग्यमंत्री म्हणाले. यावेळी वरळी येथील राज्य कामगार रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाबाबत चर्चा करण्यात आली.


























































