बाळासाहेब ठाकरे योजनेत आता अपघातग्रस्तांचे पैसे थेट रुग्णालयात जमा होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या अपघात विमा योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांसाठीचे 30 हजार रुपये आता थेट त्यांच्या संबंधित रुग्णालयात जमा होतील, अशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. या योजनेची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. याबाबत प्रसाद लाड यांनी एका लक्षवेधीद्वारे मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता.

राज्यात कुठेही अपघात झाल्यानंतर ‘बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजने’अंतर्गत 72 तास मोफत आणि तातडीने औषधोपचार मिळावेत यासाठी 30 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद 2015 मध्ये करण्यात आली, मात्र या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना मदत मिळत नसल्याचे लाड यांनी सांगितले. दोन वर्षांपासून ही योजना कागदावर असून अपघातग्रस्तांना कधी मदत मिळणार, असा सवाल प्रसाद लाड यांनी विचारला. यावर अपघातग्रस्तांना उपचारासाठी मदत मिळावी यासाठी ‘महात्मा फुले’, ‘आयुष्मान’ व ‘बाळासाहेब ठाकरे’ या तीन योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही योजनांच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच या योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.