बचावकार्यासाठी पालिकेचे एक पाऊल पुढे; रुग्णालयांमध्ये आगीचा धूर बाहेर फेकणारी यंत्रणा बसवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आग लागल्यास वेगाने धूर बाहेर फेकणारी अद्ययावत यंत्रणा लवकरच पालिका रुग्णालयात बसवली जाणार आहे. त्यामुळे आगीच्या धुरामुळे अडकून पडलेल्यांना सुरक्षित ठिकाणी बाहेर पडण्यास रस्ता दिसण्यास मदत होणार आहे. शिवाय अग्निशमन दलालादेखील बचवकार्यात मोठी मदत होणार असल्याने जीवित-वित्तहानी टाळण्यासाठी हातभार लागणार आहे.

पालिकेच्या प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांत राज्यासह देशाच्या कानाकोपऱयातून रुग्ण उपचारांसाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी दररोज मोठी गर्दी असते. या रुग्णालयांच्या विविध विभागांत, वैद्यकीय कक्षात, अतिदक्षता विभागात यांत्रिक व विद्युत प्रणाली कार्यरत आहे. दुर्दैवाने या ठिकाणी आग लागल्यास रुग्णांसह नातेवाईक, डॉक्टर-कर्मचाऱयांच्या जीविताला धोका निर्माण होतो. या ठिकाणी आग लागल्यास रुग्ण व कर्मचाऱयांना बाहेर काढणे कठीण बनते. धुरात गुदमरल्याने जीवितहानी होते.  भंडारा येथील आगीत 10 बालकांचा मृत्यू अशाच प्रकारे गुदमरून झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खातेप्रमुख यांच्या सूचनेनुसार त्यांच्या अखत्यारीत असलेल्या 16 उपनगरीय रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग अशा महत्त्वाच्या ठिकाणी आग लागलेल्या ठिकाणचा धूर शोधून बाहेर फेकणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यासाठी 2 कोटी 42 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यानुसार आलेल्या निविदानुसार मेसर्स मॅक एंटरप्रायजेस या लघुतम निविदाकाराला काम देण्यासाठी स्थायी समितीकडे 2 कोटी 40 लाख रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला गेला आहे.

असा होणार फायदा

आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे दुर्घटनास्थळी अडकलेल्यांना बाहेर पडण्यासाठी मार्ग दिसत नाही. त्यामुळे केवळ धुरात गुदमरून जीवितहानी वाढते. मात्र रुग्णालयात बसविण्यात येणाऱया यंत्रणेमुळे धूर बाहेर फेकल्याने ‘व्हिजिबिलिटी’ वाढल्याने बचावकार्यात मदत होईल, असे प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी सांगितले.

शीव रुग्णालयाच्या इलेक्ट्रिक   सिस्टममध्ये आग विझविणारी यंत्रणा 

पालिकेच्या लोकमान्य टिळक शीव रुग्णालयातील इलेक्ट्रिक सिस्टीममध्ये स्वयंचलित पद्धतीने आग विझविणारी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या ‘बी’ विभागातील 25 विभागातही अशीच यंत्रणा बसविण्यात येणार आहे. पालिकेचे शीव रुग्णालय हे 1800 बेडचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या ठिकाणी वेगवेगळे वॉर्ड, आयसीयू, ऑपरेशन थिएटर, अपघात विभाग अविरतपणे सुरू असतात. त्यामुळे येथे विजेवर चालणाऱया अनेक यंत्रसामग्री आहेत. त्यामुळे या ठिकाणी बसविण्यात आलेल्या मध्य व उच्च विद्युत दाबाचे पॅनल्स बजावण्यात आले आहेत. ‘बी’ विभागातील विविध विभागांत असलेल्या विद्युत यंत्रणेत हीच स्थिती आहे. त्यामुळे या ठिकाणी शॉर्टसर्किट किंवा बिघाड होऊन आगीची दुर्घटना होऊ शकते. हे टाळण्यासाठी विद्युत पॅनेलमध्ये स्वयंचलित पद्धतीने आग नियंत्रण प्रणाली बसविण्यात येणार आहे. 19 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडला जाणार आहे.