शैलगृहांच्या विश्वात – आजीविकांची शैलगृहे

>> डॉ. मंजिरी भालेराव, [email protected]

प्राचीन भारतीय शिल्पकला व स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे लेणी स्थापत्य. प्राचीन भारतात मौर्य व शुंग राजवटीत उदयास आलेल्या या स्थापत्यकलेतील स्थित्यंतराचा मागोवा घेणारे सदर.

शैलगृहांच्या विश्वात या मालिकेत आपण या प्रस्तरातील निवासांची माहिती घेत आहोत. आपण जेव्हा भारतातील सर्वात प्राचीन मानवनिर्मित आणि ज्यांचा काळ निश्चितपणे सांगता येतो अशा शैलगृहांचा विचार करतो, तेव्हा असे दिसते की, अशी शैलगृहे इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात बिहारमध्ये मौर्य राजांच्या काळात तयार केली गेली. आज ज्यांना ‘बाराबर’ किंवा ‘बराबर’ किंवा ‘बाराबार’ या नावांनी संबोधले जाते ती ही शैलगृहे आहेत. या ठिकाणी असलेल्या शिलालेखांमध्ये या डोंगराचा उल्लेख ‘खलतिक पर्वत’ असा येतो. येथे असलेल्या शिलालेखीय पुराव्यांवरून आज तरी ही लेणी भारतातील कालनिश्चिती करता येण्यासारखी सर्वात प्राचीन मानवनिर्मित लेणी आहेत असे म्हणता येते. बाराबार येथील शिलालेख स्पष्टपणे मौर्य घराण्यातील राजांची नावे आणि त्यांची राज्य वर्ष सांगतात. त्यामुळे यांची निर्मिती कधी झाली आणि कोणी केली हे नक्की सांगता येते.

भारतात बहुतेक वेळेस लेणी म्हटले की, बौद्ध किंवा जैन लेणी असाच विचार मनात येतो, पण भारतात तयार झालेल्या शैलगृहांमध्ये काही धार्मिक तर काही लौकिक शैलगृहेही आहेत. आजच्या लेखाचा विषय असलेली लेणी ही बौद्धांचीही नाहीत किंवा जैनांचीही नाहीत, तर ती ‘आजीविक’ किंवा ‘आजीवक’ नावाच्या पंथाच्या श्रमणांसाठी तयार केलेली होती. या ठिकाणी असलेल्या जवळ जवळ प्रत्येक मौर्यकालीन लेखातून असा उल्लेख स्पष्टपणे केलेला दिसतो. आजीविक कोण होते हे पाहण्याआधी या काळातील भारतातील सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.

इ. स. पूर्व सहावे शतक हा भारतीय इतिहासाचा अतिशय महत्त्वचाचा काळ आहे. धार्मिक, आध्यात्मिक तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडविणाऱ्या या काळात वैचारिक क्रांतीसुद्धा झाली होती असे दिसते. दुर्दैवाने भारतीय इतिहास जाणून घेताना लिखित साधनांच्या मधून इ. स. पूर्व सहाव्या शतकाच्या आधीचे फारसे संदर्भ मिळत नाहीत. पण धार्मिक साहित्यातून काही माहिती मिळते. वैदिक कर्मकांड करण्यापेक्षा आत्मा, ब्रह्म आणि जगत अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार करणाऱ्या उपनिषदांचाही हा काळ होता. यज्ञ आणि त्यासंबंधीच्या विविध कर्मकांडांना नाकारून एका वेगळ्याच तात्त्विक पातळीवर, पण वैदिक धर्माच्या चौकटीत राहूनच ही वैचारिक क्रांती झालेली पाहायला मिळते.

या काळात भारतात शेजारील राष्ट्रांमधून परदेशी लोकांचे, व्यापाऱ्यांचे येणे जाणेही सुरू असावे. त्यांच्या बरोबर काही नवीन विचार भारतात आले असावेत अशीही शक्यता आहे. हा काळ आर्थिक परिस्थितीमधील बदलांचासुद्धा होता. याला दुसरे नागरीकरण असेही म्हटले जाते. सिंधू-सरस्वती संस्कृतीचा काळ हे पहिले नागरीकरण तर इ.स.पूर्व सहावे ५वे शतक हा काळ म्हणजे दुसरे नागरीकरण. या काळात खूप झपाट्याने व्यापार वाढत होता. त्यामुळे श्रीमंत झालेला वैश्य वर्ग तसेच नवीन वसाहतींसाठी आवश्यक असणारा कारागीर वर्ग या सगळ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होत होती, परंतु त्यांचे जाती व्यवस्थेमधील स्थान हे क्रमांक तीन किंवा चार असे होते. वैदिक यज्ञधर्मातील प्राणिहिंसा, कर्मकांडाचा अतिरेक, समाजातील जाती व्यवस्था आणि त्याचे दुष्परिणाम भोगणारा मोठा वर्ग अशी काहीशी तेव्हाची परिस्थिती होती.

खूप प्राचीन असा जैन श्रमणांचा धर्म आधीच याविरोधात उभा होता. उपनिषदांचा विचार हा वैदिक विचारांच्या चौकटीत राहून वेदप्रामाण्य मानणाऱ्या लोकांचा (आस्तिक) होता, तर जैनांचा वेदप्रामाण्य न मानणाऱ्या लोकांचा (नास्तिक) होता. भारतीय परंपरेत आस्तिक आणि नास्तिक या संकल्पना वेदप्रामाण्य मान्य असणे किंवा नसणे याच्याशी निगडित आहेत. देव मानणे म्हणजे आस्तिक किंवा न मानणे म्हणजे नास्तिक असा अर्थ भारतीय परंपरेत नाही, पण सध्या समाजात सगळ्यांना तोच अर्थ माहीत असतो. असो, तर या नास्तिक परंपरेतील जे पंथ भारतात उगम पावले त्यामधले सर्वात प्राचीन हे जैन होते. त्यानंतर असे अनेक नास्तिक पंथ उदयाला आले. त्यापैकी एक आजीविक हा होता. बौद्ध, लोकायत किंवा चार्वाक हेही त्याच परंपरेतील पंथ होत.

बौद्ध धर्माचा संस्थापक गौतम बुद्ध आणि जैन धर्मातील शेवटचा तीर्थंकर भगवान महावीर यांना समकालीन असे बरेच लहान लहान पंथ इ. स. पूर्व सहाव्या शतकात उदयाला आले होते. अनेक विचारवंत प्रस्थापित धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थेला विरोध करत वैचारिक बंडाचे निशाण घेऊन उभे ठाकले. आजीविक पंथाचा संस्थापक मंखली गोशाल हासुद्धा त्यापैकी एक होता. मंखली हे त्याचे नाव संस्कृत मस्करीचे प्राकृत रूप आहे. गोशालेत जन्म झाल्याने त्याला ‘मंखली गोशाल’ असे नाव मिळाले. ‘मस्कर’ म्हणजे वेळूदंड किंवा बांबूचा दंड. ‘मस्करीन’ किंवा ‘मस्करी’ म्हणजे जो दंड हातात घेऊन फिरतो तो. तसेच तो ‘अचेलक’ म्हणजे निर्वस्त्र अवस्थेत फिरत असे. या पंथातील लोक परिव्राजक असत.

बौद्ध आणि जैन साहित्यातून आजीविकांचे संदर्भमिळतात. ते लोक कठोर तपस्या करत आणि हठयोगाची साधना करत असत. त्यामुळे यांचे शरीर कृश होत असे. मंखली गोशाल सुरुवातीला भगवान महावीर यांचा शिष्य होता. त्यांनी दोघांनी बराच काळ एकत्र काम केल्यावर त्यांचे काही कारणावरून पटेनासे झाले. तेव्हा ते दोघे वेगळे झाले. त्यामुळे या दोन्ही पंथांच्या आचारात आणि विचारात बरेच सारखे मुद्दे दिसतात. हळूहळू आजीविकसुद्धा खूप लोकप्रिय झाले. त्यांच्या पंथाचे काही ग्रंथ जरी मिळाले नसले तरी त्यांचे उल्लेख अनेक प्रकारच्या लिखित साहित्यात मिळतात. संशोधकांचा असा अंदाज आहे की, साधारणपणे इ. स. च्या १३व्या-१४ व्या शतकापर्यंत त्यांचे अस्तित्त्व कुठे ना कुठेतरी टिकून होते. त्यांना मिळालेले आश्रयदातेसुद्धा समाजातले प्रतिष्ठित लोक होते. सर्वात उल्लेखनीय म्हणजे मगधाचे मौर्य सम्राट. त्यांच्या घराण्यातील सम्राट अशोक आणि त्याचा नातू दशरथ या दोघांनीही या पंथाच्या अनुयायांसाठी बिहारमधील खलतिक पर्वतामध्ये लेणी कोरल्या, त्यामध्ये तशा आशयाचे लेखही कोरले. त्यामुळे आपणही माहिती नक्की सांगू शकतो.

आज ‘बाराबर’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या लेणी नेमक्या किती आहेत, त्यात काय आहे, त्यांचे वैशिष्ट्य काय, त्यांचा उपयोग काय हे सगळे आपण पुढच्या भागात जाणून घेऊ.

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)