गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका नव्या वर्षात

1294

राज्यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा फटका सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांना बसला आहे. 250पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या ज्या संस्था सध्या निवडणुकीस पात्र आहेत त्यांच्या निवडणुका सहकार विभागाने 31 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे या संस्थांच्या निवडणुका आता नव्या वर्षातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई, ठाण्यासह राज्यभरात सुमारे दीड लाख सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. त्यापैकी 250पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार सरकारने मार्चमध्ये सहकारी संस्थांना दिला आहे. मात्र त्यासाठी नियमावली तयार नसल्याने निवडणुका कशा घ्यायच्या याबाबत संस्थांमध्ये संभ्रम आहे. त्याची दखल घेत सहकार विभागाने निवडणुका घेण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यानुसार नियमांचे प्रारूप तयार करणे, त्याला विधी व न्याय विभागाची मंजुरी घेऊन नागरिकांकडून सूचना व हरकती मागवणे, आलेल्या सूचना, हरकतींचा विचार करून नियम अंतिम करावे लागणार आहेत. तसेच राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याच्या शक्यतेने गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीचे नियम तयार करण्यास विलंब लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या