‘पादम’पंचीवर उपाय काय? वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिंक येणे, जांभई येणे या नैसर्गिक क्रिया जशा टाळता येत नाहीत, तशाच पोटातील अतिरिक्त गॅस अवेळी बाहेर पडणं ही समस्याही टाळता येत नाही. विशेषतः चारचौघात जर पोटात गॅसने चाहुल दिली तर भलतीच फजिती व्हायची शक्यता असते.

आजकालच्या धकाधकीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हा त्रास वरचेवर होतो. आहार, खाण्याच्या वेळेत बदल आणि योगासनं याद्वारे हा त्रास दूर होऊ शकतो. सोशल मिडियावर याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. पोटात गॅस होतो आणि दुर्गंधी पसरते, यासाठी काय करावे ? या प्रश्नाला Quora या प्रश्नोत्तराच्या मंचावर डॉ. राजेंद्र गोडे आयुर्वेद महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक शुभांगी क्षीरसागर यांनी उत्तर दिले आहे.

खरं तर पोटात गॅस होत असेल तर चारचौघात जाणे, मीटिंगमध्ये बसणं म्हणजे खूप मोठा प्रश्न समोर येतो. हा गॅस जर रोखून ठेवला तर आणखी जास्तच पंचाईत होते, कधी स्फोट होईल सांगताच येत नाही. ही समस्या खूप लोकांना असते आणि त्यामुळे आत्मविश्वाससुद्धा कमी होतो आणि चारचौघात जाण्यासाठी टाळाटाळ केली जाते. पोटात गॅस होण्याचे आणि त्याचा दुर्गंध येण्याचे मूळ कारण म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित न होणे. वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर इतर पोटाचे आजार होण्याची शक्यता असते.

पचनक्रिया व्यवस्थित न होण्याची कारणे

– जेवणाच्या वेळा नियमित नसणे. (अवेळी जेवण)
– जेवताना चावून न खाणे. ( घाईघाईत जेवणे )
– जेवताना खूप पाणी पिणे.
– रात्री जागरण करणे.
– भूक लागलेली नसताना जेवण.
– मानसिक तणाव
– पोट साफ न होणे
– काही आजार असणे

पोटातील गॅस कमी करण्यासाठी खालील गोष्टी कराव्या – 

– हिंगवाष्टक चूर्ण  २-२ ग्राम जेवणाच्या सुरुवातीला तूप किंवा कोमट पाण्यासोबत घेणे

किंवा

शंख वटी – २-२ गोळ्या घेणे.

योगासन

पवनमुक्तासन

या आसनाच्या नावाचा अर्थ आहे की, हे आसन केल्याने पोटातील जमा झालेला वायू मुक्त होतो म्हणजेच बाहेर पडतो. हे आसन सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी नियमित करावे.

 आहारामध्ये काही बदल करावे 

– मोड आलेली कडधान्य शक्यतो कमी करावी किंवा काही दिवस पूर्णतः बंद करावी.
– जेवणाच्या वेळा नियमित कराव्या.
– जेवण करताना चावून चावून खावे, तसेच घाईघाईत किंवा एकदम हळूवारपणे खाऊ नये.
– कोमट पाणी प्यावे.
– जेवणानंतर भाजलेला ओवा खावा.
– ब्रेड, बिस्कीट, समोसा कचोरी ई- मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, शिळे, आंबवलेले पदार्थ खाण्याचे टाळावे.
– दिवसा झोपू नये.