
नुकताच कोरोनाचा एक नवा ‘व्हेरिएंट’ सापडला आहे. त्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नेदेखील ‘घातक आणि संक्रमक’ अशा वर्गवारीत ठेवले आहे. अत्यंत धोकादायक अशा या नव्या ‘कोरोना व्हेरिएंट’मुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा धास्तीत सापडले आहे. विविध देशांनी पुन्हा एकदा कडक नियमावली लागू करण्याचे संकेत दिले आहेत. हिंदुस्थानातदेखील सर्वतोपरी काळजी घेण्याचे आदेश विविध राज्यांनी दिले आहेत.
सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, खासगी बस सुविधा, विमाने अशा प्रवासी माध्यमातून प्रवास करताना तसेच मॉल, सिनेमागृहे, नाटय़गृहे अशा ठिकाणी आता ‘युनिव्हर्सल पास’ सक्तीचा करण्यात येत आहे. हा पास दोन लसींचे डोस पूर्ण झालेल्यांनाच प्राप्त करता येतो हे लक्षात घ्यावे, मात्र आजदेखील या पासविषयी किंवा हा पास ऑनलाइन सहजपणे कसा मिळवावा याबद्दल बऱयाच सामान्य नागरिकांना कल्पना नाही. त्यांच्यासाठी हा पास ऑनलाइन मिळवण्याची सोपी पद्धत देत आहोत.
दुहेरी लसीकरण झालेल्या नागरिकांनी http://epassmsdma.mahait.org या वेब लिंकला उघडावे. त्यानंतर citizens पर्याय निवडून, ‘universal pass for double vaccinated citizens’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपण कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करताना जो मोबाईल क्रमांक नमूद केलेला आहे, तोच दिलेल्या पर्यायात टाकावा. त्यानंतर तत्काळ या रजिस्टर मोबाईलवर ओटीपी अर्थात One Time Password एसएमएसद्वारे प्राप्त होईल.
हा ओटीपी नमूद केल्यानंतर तुमचे नाव, मोबाईल क्रमांक हा तपशील समोर येईल. माहितीची योग्य खात्री करून ‘जनरेट पास’ या पर्यायावर क्लिक करावे. आता तुमच्या दोन्ही लसीकरणाचा (व्हॅक्सिनेशन) पूर्ण तपशील, जसे की वेळ, तारीख आदी आपोआप समोर दिसतील. तिथेच तुम्हाला ‘सेल्फ इमेज’ हा पर्याय दिसेल. इथे तुम्ही तुमच्या मोबाईल गॅलरीमधून अथवा ‘सेल्फी’ घेऊन स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे.
सर्व प्रक्रिया योग्य पार पडली की, काही वेळात ‘एसएमएस’द्वारे तुम्हाला ‘ई-पास’ जनरेट झाल्याचे कळवले जाईल. या मेसेजमध्ये आलेल्या लिंकवरती क्लिक करून आपण आपला ‘युनिव्हर्सल पास’ सहजपणे मोबाईलमध्ये सेव्ह करू शकाल.



























































