
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने आक्रमक झालेल्या राज्यातील 17 लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाला सुरुवात केली.त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश सरकारी कार्यालये ओस पडली होती. सरकारी कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी मोर्चे काढून, निदर्शने करून राज्य शासनाचा निषेध केला.
सोलापूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर : जिल्ह्यात या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील हजारो कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका सर्व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वीरुपक्ष धिरडे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंतनू गायकवाड यांच्यासह शहरातील विविध शासकीय कार्यालयातील हजारो कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांकडून जिल्हा परिषदेसमोरील चौकात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.यात महिला कर्मचाऱ्यांचा सहभागी मोठय़ा प्रमाणात होता.कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी संपाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.एकच मिशन, जुनी पेन्शनचा नारा देत कर्मचाऱयांनी पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला, तर मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कामावर न जाण्याचा निर्धार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांनी केला आहे. यामुळे तालुक्यातील शाळा बंद आहेत.
कोल्हापुरात 70 हजार कर्मचारी संपावर
कोल्हापूर : जिल्ह्यातील 92 संघटनांचे 70 हजारांहून अधिक सरकारी कर्मचारी शिक्षक सहभागी झाले आहेत. आज कोल्हापुरात राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मोर्चा काढण्यात आला.
कर्मचाऱयांनी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, मोर्चाचा मार्ग दणाणून सोडला. टाऊन हॉलमधून सुरू झालेला मोर्चा प्रमुख मार्गावरून पुन्हा टाऊन हॉलमध्ये आला. येथेच मोर्चाची सांगता करण्यात आली. राज्य शासनाने त्वरित 2005 पूर्वीच्या दराने पेन्शन योजना सुरू करावी अन्यथा 1977 साली झालेल्या संपापेक्षाही मोठा संप करण्याचा इशारा यावेळी समितीच्या पदाधिकाऱयांनी दिला. शासन जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर करत नाही, तोपर्यंत संप सुरू राहील, असे संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी सांगितले. दरम्यान, संपामुळे अनेक सरकारी कार्यालयात शुकशुकाट होता. शिक्षकही संपात सहभागी झाल्याने शाळा बंद राहिल्या. उद्याही शाळा सुरू की बंद यावरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. राधानगरी, गडहिंग्लजसह सर्वच तालुक्यांमधील कर्मचारी संपात सहभागी झाले होते.
सांगली जिल्ह्यातील 20 हजार कर्मचारी संपात सहभागी
सांगली : जिल्ह्यात सरकारी-निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषदा, शासनाचे अनुदान घेणारी महानगरपालिका, नगरपालिका, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर असे जिल्ह्यातील सुमारे 20 हजार कर्मचारी संपात सहभागी झाले. कर्मचारी संपावर गेल्याने सर्व कार्यालयात शुकशुकाट होता. मात्र, अधिकारी उपस्थित होते. सरकार पेन्शन देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या मारून निदर्शने केली. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी सरकारी कर्मचारी संघटनेचे पी. एन. काळे, डी. जी. मुलाणी, समन्वय समितीचे बाबासाहेब लाड, जुनी पेन्शन हक्कचे अमोल शिंदे यांनी केली. जिल्हा परिषदेचे 4263, प्राथमिक शिक्षक 4727, माध्यमिक शिक्षक 5000, महसूलचे 784 आणि अन्य विभागातील 5226 कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.
आरोग्य सेवा विस्कळीत
संपामुळे जिह्यातील आरोग्य सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली. पर्यायी व्यवस्थेसाठी एनआरएचएमचे काही कर्मचारी तसेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, मेडिकल ऑफिसर, आशा यांचे सहकार्य घेण्यात आले. नार्ंसग झालेल्या कर्मचाऱयांवर मंगळवारी लसीकरणची जबाबदारी देऊन लसीकरण सुरू ठेवण्यात आले. अलीकडेच आरोग्य विभागात अधिकाऱयांची भरती झाल्याने त्यांच्यावर ओपीडीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे फारसा परिणाम झाला नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले.
नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
नगर : राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱयांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी मंगळवारपासून बेमुदत संप सुरू केला असून, कर्मचारी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध सरकारी विभागातील कर्मचाऱयांसह शिक्षक, परिचारिका व विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक, जिल्हा परिषद कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, लिपिक वर्गीय आदी संघटनांनी आक्रमक आंदोलन केले. यावेळी कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजदेखील ठप्प झालेले दिसून येत होते. जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही, तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहील, असा इशारा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमाळे यांच्या नेतृत्वाखाली हा बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे. परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा आंधळे यांच्यासह परिचारिका मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

























































