तबेल्यातून निघायचा हुक्क्याचा धूर; पाचजणांना अटक

31

सामना प्रतिनिधी । कल्याण

तबेल्यात गाई, म्हैसी पाळण्याऐवजी हुक्का पार्लरचा अड्डा चालवणाऱ्या गावगुंडांच्या मुसक्या आज कल्याण पोलिसांनी आवळल्या. दिसायला तबेला मात्र आतमध्ये जनावरांऐवजी हुक्क्यातून धूर सोडणारे चरसी पाहून पोलीसही चक्रावून गेले. पोलिसांनी पाचजणांना अटक केली असून हुक्का पार्लरचे साहित्य जप्त केले.

दुर्गाडी परिसरात बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील अनेक ठिकाणांची झडती घेतली. मात्र त्यांना हुक्का पार्लर काही आढळून आला नाही. यावेळी पोलिसांना खबऱ्याने एका तबेल्यात हुक्का पार्लर सुरू असल्याचे सांगितले. नॅशनल उर्दू शाळेच्या भिंतीलगत असलेल्या इक्लाख मौलकी याच्या म्हशीच्या तबेल्याजवळ धाड टाकली असता या ठिकाणी हुक्का पार्लर सुरू होता. जनावरांऐवजी हुक्क्यातून धूर सोडणारे चरसी असे येथे चित्र होते. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करून मुनावर शेख, फईम खान, खालीद मुल्ला, मोहमंद सैयद, मेमन या पाचजणांना अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या