नैरोबीत पाठवून तरुणींवर वेश्याव्यवसाय करण्याची बळजबरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

नैरोबी देशातील डान्स बारमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देऊ, असे आमिष दाखवून तरुणींना तेथे पाठविल्यानंतर त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱया अॅग्नेस रोनाल्ड हॅमिल्टन (56) या महिलेला गुन्हे शाखेच्या युनिट-5 व खंडणीविरोधी पथकाने संयुक्त कारवाई करून बेडय़ा ठोकल्या.

सहार पोलीस ठाण्यात ‘पिटा’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. युनिट-5 चे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत, पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, विश्वनाथ जाधव व खंडणीविरोधी पथकाचे एपीआय राजू सुर्वे, महिला अंमलदार कुमुदिनी जाधव व पथक या गुह्याचा तपास करीत असताना असे निष्पन्न झाले की, लोखंडवाला परिसरात राहणारी ऍग्नेस रोनाल्ड हॅमिल्टन नावाची महिला ओशिवरा परिसरात डान्स स्टुडिओ चालविते. ऍग्नेस तिच्या स्टुडिओत येणाऱया तरुणींना तिच्या परदेशातील दलालांमार्फत नैरोबी देशातल्या डान्स बारमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावून देते असे सांगून पाठवते.

सुरुवातीला काही दिवस तेथील डान्स बारमध्ये काम देण्यात येते. काही दिवसांनंतर मात्र त्या तरुणींना जबरदस्ती वेश्याव्यवसाय करायला लावले जाते. जर त्या मुलींनी मायदेशात परतण्याचा तगादा लावला की तेथेच खोटय़ा गुह्यात अडकविण्याची धमकी दिली जाते अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार पोलिसांनी ऍग्नेसला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने अशाप्रकारचा गुन्हा करीत असल्याची कबुली दिली. त्यामुळे तिला अटक करण्यात आली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आखाती देशातील हॉटेलमध्ये किचनचे काम मिळवून देतो अशी बतावणी करून तरुणींना तेथे पाठविल्यानंतर त्यांना जबरदस्ती वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱया तिघा भामटय़ांना खंडणीविरोधी पथकाने बेडय़ा ठोकल्या होत्या.